नाशिक/एनजीएन नेटवर्क
” विचारांच्या मंथनातून शब्द सौंदर्याची निर्मिती होत असते. मनातील प्रामाणिक विचार शब्दातून पुस्तकात उतरले तर वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. देवकी कुलकर्णी यांनी ‘मंथनामृत’ लेख संग्रहातून मांडलेले विचार शब्द सौंदर्याची प्रचिती देणारे आहे”, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.
नाशिकच्या लेखिका देवकी कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘मंथनामृत’ या लेखसंग्रहाचे कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात डॉ. विनायक गोविलकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी विश्वास ठाकूर, साप्ताहिक कुसुमाग्रज नगरचे कार्यकारी संपादक पद्माकर देशपांडे, लेखिका देवकी कुलकर्णी, सरस्वती औंढेकर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. गोविलकर म्हणाले, की मंथनामृत लेख संग्रहातून मनातील संवेदना अनुभवास येतात. पुस्तकाच्या विविध लेखांतून त्यांची विचार करण्याची पद्धत अधिक प्रगल्भ असल्याचे जाणवते. लेखिकेला कुटुंबातून वैचारिक बाळकडू आणि प्रेरणा मिळाल्याने हे यश त्यांना प्राप्त झाले आहे. विश्वास ठाकूर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तर प्रकाशक पद्माकर देशपांडे यांनी पुस्तक प्रकाशनामागील भूमिका विशद केली. यावेळी क्षिप्रा कुलकर्णी यांनी ‘पालवी’ लेखाचे अभिवाचन केले. सोनाली तेलंग यांनी सूत्रसंचालन केले. या प्रकाशन सोहळ्यास नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.