नाशिक/एनजीएन नेटवर्क
जे घरी बसून काम करतात, त्यांना जनता घरीच बसवते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. लोकांच्या दारोदारी सरकार फिरतेय, अशी टीका काही विरोधक करू लागलेल आहेत. त्याला मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांनी देखील त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे, अशी टिप्पणीही शिंदे यांनी केली.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. शिंदे म्हणाले, दारोदारी फिरवून सामान्य माणसांची काम करण्यासाठी हे जनतेचे सरकार स्थापन झाले आहे. घरी बसून राहण्यासाठी सत्ता नसते, ही सत्ता लोकांच्या दारात घराघरात जाऊन योजना राबवण्यासाठी असते, लोकांपर्यंत जाण्यासाठी सत्ता असते. शासन आपल्या दारी लोकाभिमुख कार्यक्रम असून एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना घेता येत आहे.
‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम क्रांतिकारी असून या माध्यमातून आम्ही लोकांच्या हिताची कामे करत आहेत. तसेच पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्वीकारून अजित पवार आमच्यासोबत आले असून राज्याच्या विकासाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. अडीच वर्षात अनेक विकासकामे थांबली होती. पण, आमच्या सरकारने सर्व स्पीड ब्रेकर काढून ती सर्व कामे पुन्हा सुरु केली, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आम्ही तीन जण एकत्र आलो असून आम्ही समजूतदार आहोत. तसेच देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे असून ते निष्कलंकित माणूस आहेत. विरोधकांची वज्रमूठ सभा ही वज्रझूठ सभा ठरली आहे. त्यांनी जेवढे आरोप केले तेवढ्या त्यांच्या जागा कमी झाल्या, असेही शिंदे म्हणाले.
शासन रामदरबारी आले : फडणवीस
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये शासन रामदरबारी आले आहे. जे राज्य काम करते ते रामराज्य असते. त्यामुळे हा शासकीय योजनांचा कुंभमेळाच आहे, ज्याच्यामुळे आपण सगळे एकत्र आला आहात. कुंभमेळ्याच्या या सेवा तीर्थावर आपली सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. पण कधी कधी चांगले काम केले तरी लोकांच्या पोटात दुखते. लोकांना लाभ दिला तरी लोकांच्या पोटात दुखत. पण आता चिंता करू नका, आता कोणाच्याही पोटात दुखलं तर त्या पोट दुखीवर औषध देण्याकरता डॉ. एकनाथ शिंदे आणले आहेत, अशी मिश्किल टिपण्णी फडणवीस यांनी केली.