मुंबई/एनजीएन नेटवर्क
चित्रपट दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एनडी स्टुडीओत आत्महत्या केली. यानंतर चित्रपट सृष्टीला मोठा हादरा बसला आहे. बुधवारी पहाटे चार वाजता गळफास घेऊन नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान देसाई यांनी आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे असतानाच देसाई यांच्यावर मोठे कर्ज होते असे वृत्त समोर येत आहे.
नितीन देसाई यांनी180 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले होते. मात्र त्या मुळ रकमेवरील व्याज वाढून कर्जाची रक्कम सुमारे 249 कोटी रुपयांवर पोहोचली होती अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने एन.डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की ओढावली होती. नितीन देसाई यांनी सीएफएम या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. 2016 आणि 2018 अशा वेगवेगळ्या दोन वर्षात कर्जाचा करार नामा झाला होता. यासाठी देसाई यांनी विविध सर्व्हेनंबर असलेल्या तीन मालमत्ता (26 एकर, 5-89 एकर आणि 10.75 एकर) तारण ठेवली होत्या, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली होती. नितीन देसाई यांच्याकडून कर्जाची वसुली होत नव्हती.
कलिना मुंबईस्थित असणाऱ्या एडलवाइस ॲसेट रिकंन्स्ट्रक्शन कंपनीने मालमत्ता जप्त करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. मात्र या प्रस्तावावर जिल्हा प्रशानाने अद्याप कोणताच निर्णय दिलेला नव्हता असेही वृत्त समोर येत आहे. या सर्व घटनेतून नितीन देसाई यांना नैराश्य आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.