नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वधारत असताना आता त्याचे चटके थेट बड्या मंडळींना बसू लागले आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भररस्त्यात चेन स्नॅचिंगचा हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, डॉ. पवार यांच्या आई शांताबाई बागुल आरटीओ परिसरातील बाजारामध्ये भाजी घेण्यासाठी गेल्या असताना ही घटना घडली. स्कुटीवरून आलेल्या दुचाकीस्वारांनी राजरोसपणे चेनस्नॅचिंग केल्याचे बागुल यांनी सांगितले. बागुल यांच्या तक्रारीवरुन म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोन ते अडीच तोळ्याच्या मंगळसूत्राच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
@ सायंकाळच्या वेळेला भाजी घेऊन येत असताना एक गाडी माझ्याकडे आली. त्यावरील दोन व्यक्तींनी माझ्या गळ्यात हात टाकला आणि मंगळसूत्र खेचले. आजूबाजूला कोणीच नव्हते. मला काहीच सुचेनासे झाले. दोघेही स्कूटीवर आले होते. आयुष्यात पहिल्यांदा भाजी घ्यायला गेले आणि हे असे झाले. मी त्यावेळी एकटीच होती. दुर्गानगर परिसरात सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
- शांता बागुल, तक्रारकर्त्या