NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘ते’ सरकार स्थापण्याचा निर्णय पवारांच्या संमतीनेच..फडणवीसांचा गौप्यस्फोट

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकींनंतरच्या अभुतपूर्व सत्तासंघर्षादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अचानक पहाटेच्या वेळी राजभवनात उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. याच पहाटेच्या शपथविधीसंदर्भात आता विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी नवीन खुलासा केला आहे. हा शपथविधी कधी झाला? शपथविधीच्या आधीच्या दिवसांमध्ये काय घडले याबद्दलची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल भाष्य करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवारांचे गुपीत समजून घ्यायचे असेल तर त्यांचा इतिहास समजून घ्यायला हवा. हा इतिहास समजला तरच गुपीत उघड करता येईल. उद्धव ठाकरेंनी युती तोडून मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरु केली. त्यानंतर त्यांनी (उद्धव ठाकरेंनी) आमचा फोनही घेणणे बंद केले. त्यावरुनच ते आमच्याबरोबर येणार नाहीत हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्हीही पर्याय शोधण्यास सुरुवात केली. आमच्याकडे कोणते पर्याय आहेत याचा आम्ही विचार करत असताना राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितले की, एनसीपी भाजपाबरोबर येऊ शकते आणि राज्यात स्थिर सरकार देऊ शकते, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

भाजप-शरद पवारांची बैठक

राष्ट्रवादी सोबत येईल असे संकेत मिळाल्यानंतर भाजपा आणि शरद पवारांची बैठक झाल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक झाली. त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याचे ठरले. सरकार कसे असेल, याचा आराखडा एकत्रितपणे तयार करण्यात आला. या सरकारचे नेतृत्व अजित पवार आणि मी दोघे करणार असेही ठरले. सर्व अधिकार आम्हाला देण्यात आले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारीही केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी यामधून माघार घेतली, असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला.

.. म्हणून सरकार पडले

आमचा शपथविधी व्हायच्या 3-4 दिवस आधी शरद पवारांनी यामधून माघार घेतली. आम्ही (अजित पवार आणि मी) पूर्ण तयारी केली होती त्यामुळे अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय इतर पर्याय उरला नाही. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. आपण इतक्या बैठका घेतल्या असल्याने बाकीच्या (राष्ट्रवादीच्या) आमदारांसहीत शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण तसे घडले नाही आणि शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळेच आमचे सरकार पडले. मात्र मी हे ठामपणे सांगेन की, त्यावेळी जो सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता त्याची सुरुवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.