- अश्व पंढरीत ३२०० घोडे दाखल ; ब्रह्मासचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत
नंदुरबार : विशेष प्रतिनिधी
दररोज प्यायला दहा लिटर दूध, दोन वेळा मसाज, खास वातानुकूलित कक्ष अन् दिमतीला चार सेवेकरी, साधा आहार परंतू महिन्याला खर्च एक लाखाहून अधिक, असा राजेशाही थाट असलेला मारवाड जातीचा देखणा व धिप्पाड ६८ इंच उंची असलेला ब्रम्हास घोडा गुजरात राज्यातून सारंगखेडा येथील अश्व पंढरीत दिमाखात दाखल झाला. यावेळी ब्रह्मासचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
गुजरात राज्यातून येथील अश्व बाजारात यंदाच्या सर्वाधिक महागडा १५ कोटींचा ब्रम्हास घोडा दाखल झाल्याने अश्व बाजाराला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. गुरुवारी सकाळी दिमाखात ब्रह्मासचे आगमन झाले. चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी अश्व मालक नागेश देसाई यांचे स्वागत केले . येथील यात्रेनिमित्त भरणारा घोडे बाजार देशाच्या घोडे बाजाराचे नेतृत्व करतो . अश्व बाजाराला चेतक फेस्टिवलची जोड मिळाल्याने या बाजारात यंदा तब्बल ३२०० घोडे दाखल झाले आहेत . त्यापैकी पाचशेहून अधिक अश्वांची किमंती कोटीच्या घरात आहे . ब्रम्हास हा अश्व बाजाराची शोभा वाढवित आहे . त्याने अश्व प्रेमीवर गारुड केले असून, त्याला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
६८ इंच उंची
धिप्पाड शरीरयष्टी, देखणा व रुबाबदार असलेला ब्रह्मास ६८ इंच उंचीचा मारवाडी जातीचा अश्व असून त्याची उंची अजून तीन इंच वाढेल असे त्याचे मालक श्री. देसाई यांनी सांगितले. महिन्याला जवळपास एक लाख रुपयाहून अधिक खर्च ब्रह्मासवर होत असून त्याला गुजरात, महाराष्ट्र व पंजाब मधील अश्व शौकिनांनी मागितला. परंतु देसाई यांनी विकण्यास नकार दिला. तो या यात्रेत येणाऱ्या प्रत्येक अश्वशौकिनाला भुरळ घालत आहे. ब्रह्माससाठी अश्व बाजारात खास व्हीआयपी कक्ष तयार करण्यात आला असून त्याची निगा राखण्यासाठी शाही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्यासाठी खास एसी आणि पेंडॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याच्या दिमतीला चार सेवेकरी ही तैनात आहेत.
हरभरे, दुधाचा खुराक
ब्रम्ह्यासचे वैशिष्ठ्य म्हणजे अन्य अश्वांप्रमाणे त्याला काजू, बदाम, अंडे न देता करडीची कुट्टी, हरभरे व दुधाचा खुराक दिला जातो. मारवाड जातीचे घोडे प्रचंड बळकट असतात. तसेच त्यांची शरीरयष्टी मजबुत असते . नियमित व्यायाम करून घेतला जातो तसेच दर सहा महिन्यांनी त्याचे लसीकरण केले जाते या अश्वांच्या कानाची टोके उंच आहेत. अश्वांची कानाची टोके उंच असणे शुभ लक्षणे मानले जाते.
ब्रह्मोस क्षेपणास्त्रावरून नामकरण
ध्वनीच्या वेगाहून अधिक वेगवान भारतीय सेनेत असलेल्या ब्रह्मोस या क्षेपणास्त्रावरून या घोड्याचे नाव ब्रह्मास ठेवण्यात आले आहे. देशातील सर्वात चॅम्पियन घोडी असलेली अश्वशक्तिचा ब्रह्मास हा मुलगा आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन कोटीहून अधिक उलाढाल झाली आहे. यावर्षी घोडे विक्रेत्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Comments are closed.