NGN News
Latest Marathi News

‘ती’ जाहिरात देणारा मंत्री भाजपचा नव्हे; आ. रोहित पवार यांचा दावा

नाव लवकरच जाहीर करण्याचे संकेत; म्हणाले, सरकार परस्परांतील लाथाळ्यात मग्न

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्यभर समस्यांचा ढीग असून दिवसागणिक आठ शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. या भीषण वास्तवाकडे दुर्लक्ष करून महायुती सरकार परस्परांतील लाथाळ्या आणि कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करून आत्मानंद घेत असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. रोहित पवार यांनी केली.

येत्या १४ आणि १५ सप्टेंबर रोजी पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि महामोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. पवार रविवारी शहरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून नियोजित उपक्रमांचा आढावा घेतला. ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत झालेल्या निर्णयाचे श्रेय सत्तेतील इतर दोन पक्षांना मिळू नये, यासाठी कोट्यवधींच्या प्रसिध्द झालेल्या जाहिरातीत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र वापरण्यात आलेल असावे. आपल्या माहितीप्रमाणे, जाहिराती देणारा मंत्री भाजप नव्हे तर इतर पक्षातला आहे. त्याचे नाव लवकरच जाहीर करू, असे संकेत आ. पवार यांनी दिले.

‘कुंभ’ ची कंत्राटे गुजरात, तेलंगणा येथील व्यक्तींना…

नासिक-त्र्यंबकेश्वर येथील प्रास्ताविक विकासकामांबद्दल ते म्हणाले, ही कामे लहान आणि मराठी कंत्राटदारांना न देता गुजरात तसेच तेलंगणा येथील व्यक्तींना का दिली जाताहेत, हे कळत नाही. यासंदर्भात ‘जलजीवन’ विभागाचे उदाहरण देताना त्यांनी ती कामे कोणाला दिली गेली, याची माहिती घ्या, असे आवाहन माध्यमांना केले. कुंभमेळ्याच्या पवित्र काळात अपवित्र कामे होत असल्याचा टोला त्यांनी लावला. मंत्री संजय शिरसाठ यांच्याविरोधात पुरेसे पुरावे देवूनही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई न केल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

Comments are closed.