नंदुरबार/एनजीएन नेटवर्क
सातत्याने चर्चेत येणाऱ्या आश्रमशाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबाबत राज्य शासन गंभीर आहे. हा दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तीमाही परीक्षांसह शिक्षकांचीही तीमाही चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या शैक्षणिक दर्जाचे मूल्यमापन होणार असल्याचे मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी येथे सांगितले.
राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी सध्या आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या बांधकामासाठी कोट्यावधींचा निधी देण्यात आला आहे. यातून अनेक प्रकल्पातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांचा कायापालट होत असतांना दुसरीकडे आश्रमशाळांमधील शैक्षणिक दर्जाबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता याबाबत कठोर पावले उचलले जात आहेत. त्यामुळेच यापुढे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये दहावी, बारावी परीक्षेत ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्यात येईल, असा निर्णय विभागाने घेतल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले. आश्रमशाळेतील मुले पहिलीपासून दहावीपर्यत आश्रमशाळेतच राहत असतांना ते नापास होतातच कसे, असा प्रश्न उपस्थित करुन या मुलांना कमीतकमी ७५ टक्के गुण मिळायला हवेत, असे गावित म्हणाले.