नाशिक/एनजीएन नेटवर्क
शाळेत मोबाईलचा वाढता वापर चिंताजनक होवू पाहत असतानाच नाशिक महापालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शाळेत मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार आहे.
या निर्णयामुळे गुरुजींना शाळेत येताना आपले मोबाईल मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जमा करण्याची सक्ती करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका शिक्षणाधिका-यांनी तसे आदेश जारी केलेत. याची अंमलबजावणीही काटेकोरपणे केली जाणार आहे.. शाळांमध्ये अचानक पाहणी करून वर्ग सुरू असताना शिक्षकांकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याआधी सोलापुरात शाळेच्या वेळेत गुरुजींना मोबाईल वापरण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
शिक्षेचे स्वरूप असे..
शाळा व्यवस्थापन समिती दंडाची रक्कम ठरवणार आहे. प्रथम नियम मोडल्यास 100 रुपयांचा, दुस-यांदा नियम मोडल्यास 200 रुपयांचा दंड वसूल करणार आहे. दोनवेळा दंडात्मक कारवाई होऊनही मोबाईल वापरल्यास मोबाईल जप्त करणार शिक्षकांना शाळेत तर मोबाईल घेऊन येता येईल. मात्र, शिकवताना किंवा शाळेच्या व्हरांड्यात मोबाईल वापरण्यास मनाई असेल. विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेऊन याचे अनुकरण करु नये म्हणूनच हे पाऊल उचलण्यात आले आहे.