- ५० वर्षांवरील महिलांसाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन स्वस्थ नारी, निरोगी परिवार हे विशेष अभियान राबवत आहे. हे अभियान दि. १७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आले आहे. विशेषतः ५० वर्षांवरील महिलांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.
या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे आणि त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे आहे. या शिबिरांमध्ये महिलांच्या स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी, रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी, रक्ताची हिमोग्लोबिन तपासणी इतर सामान्य आरोग्य समस्यांसाठी समुपदेशन करण्यात येणार आहे.
या अभियानात राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्य उपकेंद्रे सहभागी होणार आहेत. या अभियानामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी प्रोत्साहन मिळेल आणि गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार सुरू करण्यास मदत होईल. यामुळे स्वस्थ नारी, निरोगी परिवार हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल. त्यामुळे या अभियानात सक्रियपणे सहभागी होऊन आपल्या आपल्या कुटुंबातील महिलांना आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.
Comments are closed.