- औद्योगिक संघटनांच्या वतीने हृद्य सन्मान सोहळा; मान्यवरांची उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सिंहस्थ पर्वणीचा योग्य लाभ घेत दिल्ली व मुंबई स्तरावर पाठपुरावा करून नाशिकच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेण्यात येईल. त्या निधीतून दीर्घकाळ टिकणारी, शाश्वत आणि नाशिककरांच्या लक्षात राहतील अशी विकासकामे करण्यात येतील, असे आश्वासन नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले.
नासिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा), नाईस, लघु उद्योग भारती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, निवेक आदी औद्योगिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने निमा सभागृहात आयोजित सत्कार सोहळा व संवाद कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, निवेकचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, उद्योग आघाडीचे सतीश कोठारी, निमाचे सचिव राजेंद्र अहिरे , ट्रान्सपोर्ट असोसिएशन चे राजेंद्र फड आदी उपस्थित होते.
महापौर सौ. आहेर-आडके म्हणाल्या की, नाशिक एमआयडीसीतील दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या मंजुरीसाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार असून दरवर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पातून एमआयडीसीतील रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाईल. उद्योग क्षेत्र हा नाशिकच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध राहील. नाशिकचा सांस्कृतिक, औद्योगिक व सामाजिक असा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न राहील. नाशिककरांच्या सर्व सूचना व अपेक्षांचा सन्मान ठेवून मैत्रीपूर्ण समन्वयातून काम केले जाईल. शहराच्या विकासासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स कमिटी’ स्थापन केली जाईल. भावी पिढीच्या दृष्टीने नाशिकमध्ये स्किल युनिव्हर्सिटी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आयटी क्षेत्राच्या विकासावर विशेष भर देत नाशिकला रोजगारनिर्मितीच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
नाशिक हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी अधिकाधिक विश्रांतीगृहे उभारली जातील. स्वच्छतेच्या बाबतीत नाशिकला इंदूरच्या धर्तीवर विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
उपमहापौर विलास शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना नाशिकच्या सौंदर्यीकरणासाठी उद्योजकांनी काही चौक व मोकळ्या जागा दत्तक घेऊन त्या हिरवागार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी केले. त्यांनी विमानतळासाठी नाशिक–ऊन सिटी लिंकच्या फेऱ्या वाढवाव्यात, औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या कामांना गती द्यावी, नव्या गुंतवणुकीसाठी सवलती देण्यात याव्यात, भुयारी गटार योजना तातडीने राबवावी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधा सुधाराव्यात, अशा विविध मागण्या मांडल्या.
यावेळी विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही आपापल्या सूचना मांडल्या. भुयारी गटार योजना त्वरित कार्यान्वित करावी, औद्योगिक वसाहतीतील रस्ते चकाचक करावेत, बंद पथदीप तातडीने सुरू करावेत, सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवावी, कुंभमेळा ही एक संधी आहे याचा विचार करून नाशिकचा सर्वांगीण विकास करावा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हायस्कूल ग्राउंडचा पार्किंगसाठी प्राधान्याने विचार व्हावा, नाशिकमधील प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलावीत तसेच बंद जकात नाक्यांच्या ठिकाणी ट्रक टर्मिनल उभारावेत, अशा सूचना करण्यात आल्या.
कार्यक्रमास निशिकांत अहिरे, के. आर. बेदमुथा, निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी, किरण पाटील,संदीप भदाने, अखिल राठी, हर्षद ब्राह्मणकर, आयमाचे सचिव संजय महाजन, नितीन आव्हाड, कैलास पाटील, रामहरी संभेराव, राजेश गडाख, बाळासाहेब जाधव, विरल ठक्कर , गोविंद बोरसे, संजय राठी, अनिल मंत्री, जसपाल शर्मा , कैलास आहेर, सचिन कांकरेज, प्रकाश गुंजाळ, नाना देवरे, मितेश पाटील, आदित्य अंद्रुटकर आदींसह उद्योजक व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.