वणी/एनजीएन नेटवर्क
सहा द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ४९ लाख १९ हजार ५२ रुपयांना फसवणूक करणाऱ्या संशयित व्यापाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. दिंडोरीतील हस्तेदुमाला शिवारातील सहा शेतकऱ्यांचा द्राक्षमाल खरेदी करून कोणताही मोबदला न देता गायब झाल्याचा आरोप संशयित व्यापारी मोहंमद अन्वर शाह (४५) याच्यावर आहे.
प्राप्त माहितीनुसार, संशयित शाह याने गेल्या फेब्रुवारीत सहा शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी केली होती. मात्र, द्राक्षमाल खरेदीनंतर कोणताही मोबदला न देता तो परागंदा झाला होता. त्याच्याविरोधात वणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलीस तपासाची चक्रे फिरली. वणी पोलीस पथकाने कल्याण तालुक्यात बनेली गाव येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित मोहमंद शाह यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याजवळ दोन गावठी बंदुका मिळून आल्या. सदर गुन्ह्यात संशयित हा कल्याण जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याने न्यायालयाकडून त्याचा ताबा घेऊन त्यास वणी पोलीस ठाणेकडील फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यास दिंडोरी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.