नाशिक/एनजीएन नेटवर्क
दोन दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडील ९७ हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावल्याचा धक्कादायक प्रकार वर्दळीच्या महात्मा गांधी रोडवर घडला. त्याच्याकडील रोख रकमेसह गळ्यातील सोनसाखळी, भ्रमणध्वनी आणि एटीएम कार्डही हिसकाविले. एटीएम कार्डचा वापर करीत त्याव्दारे पैसे काढले होते. याप्रकरणी संशयिताला स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकच्या वतीने ताब्यात घेण्यात आले आहे.
तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित हा शहापूर तालुक्यात असल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार रवाना झालेल्या पथकाने शहापूर तालुक्यातील खरीवली, निमणपाडा येथे जावून किरण गोरे (२४, रा. बामणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बंदूक, एसबीआय आणि ॲक्सिस बँकेचे डेबीट कार्ड, जबरीने चोरलेला माल तसेच इतर दोन भ्रमणध्वनी हस्तगत करण्यात येवून त्याला नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.