नाशिक/विशेष प्रतिनिधी
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘न्यूज एरिना इंडिया’ नामक संस्थेने जाहीर केलेल्या सर्वेक्षणाने एकीकडे भाजप-शिंदे गटाला हायसे वाटणारी परिस्थिती दर्शवण्यात आलेली असली तरी शिवसेना ठाकरे गटाला त्याने चिंतेत टाकले आहे. सदर सर्वेक्षणात भाजप सर्वाधिक मोठा पक्ष दाखवताना शिंदेंच्या शिवसेनेसह अपक्षांना सोबत घेत पुन्हा युती सरकार येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच सर्वेक्षणात राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाची पाटी कोरी दाखवण्यात आली आहे तर शिंदे गटाचा यशालेखही तीन जागांवर सीमित करण्यात आला आहे. याचाच अर्थ शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटांना आपापली दिशा बदलणे अपरिहार्य ठरणार आहे.
सोमवारी जाहीर झालेल्या या सर्वेक्षणामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील राजकीय लेखाजोखा मांडण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण ४७ जागा आहेत. त्यामध्ये सर्वाधिक नाशिक जागा (१५) तर पाठोपाठ जळगाव (१२), अहमदनगर (१०) आणि धुळे, नंदुरबार (प्रत्येकी ५ ) अशी जिल्हानिहाय स्थिती आहे. एकूण जागांची मांडणी करताना सर्वेक्षणामध्ये भाजपला सर्वाधिक २३, राष्ट्रवादी कॉंग्रेसला १४, कॉंग्रेसला ६, शिंदेंच्या शिवसेनेला ३ तर अपक्ष १ असा आलेख दाखवण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेला भोपळा दाखवण्यात आला आहे. याच अनुषंगाने संघटनात्मकदृष्ट्या विकलांग होत चाललेल्या ठाकरे गटातील ‘आउटगोइंग’ वाढल्यास नवल नाही. तथापि, सत्तेमध्ये असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेसाठीही उत्तर महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या फार मोठा लाभदायी ठरणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
वस्तुतः, शिवसेना ठाकरे गटातील सर्व बडे नेते शिंदेंना जावून मिळाले आहेत. नाव घेण्याजोगी काही मंडळी सोडली तर निवडून येण्याची क्षमता राखून असलेल्या नेत्यांची ठाकरे गटात वानवाच आहे. तथापि, सत्तेतल्या शिवसेनेत गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री आहेत. शिंदेंच्या उठावात जळगावमधील पाच तर नाशिकमधील दोन आमदार सहभागी झाले आहेत. याचा अर्थ सर्वेक्षण तूर्तास प्रमाण मानले तर उत्तर महाराष्ट्रात शिंदेंच्या चार विद्यमान आमदारांना मतदार घरी बसवणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सारांशात, नूतन सर्वेक्षण जसे ठरे गटाला नैराश्याची प्रचीती देणारे ठरावे, तसेच ते शिंदे गटालाही आत्मचिंतन करायला लावणारे ठरावे.
नाशिक जिल्ह्यात काय ?
नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागा आहेत. त्यापैकी सर्वाधिक ६ जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहेत तर उर्वरित जागांमध्ये भाजप ५, शिंदे गट २ तर कॉंग्रेस आणि एमआयएम प्रत्येकी १ अशी स्थिती आहे. मतदारसंघनिहाय अभ्यास केल्यास एक ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला फटका बसू शकतो. ती जागा नेमकी कोणाच्या खात्यात जाऊ शकते, हे येणारा काळ ठरवेल. तर कॉंग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघ भाजपला मिळू शकतो. अर्थात, हा अवघा अंदाजाचा भाग आहे. प्रत्यक्ष निवडणुकीला वर्षाहून अधिक काळाचा अवधी असल्याने पुलाखालून बरेच पाणी वाहणार आहे, हे लक्षात घायला हवे.