NGN News
Latest Marathi News

गुन्हेविश्वावरील ‘ सर्जिकल स्ट्राईक’ आरंभशूरत्व ठरू नये ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

राजकीय दबावाच्या ओझ्याखाली वावरणाऱ्या ‘खाकी’ ला योग्य ठिकाणी दंडुका चालवण्याचे स्वातंत्र्य दिल्यानंतर येणारी अनुभूती सुखद असते, याची प्रचिती नाशिकमध्ये यावयास प्रारंभ झालाय, असे म्हणायला हरकत नाही. आता तर दस्तुरखुद्द राज्याच्या ‘मुखिया’नेच खाकीला दबावमुक्त केल्याने नाशकात कायदा सुव्यवस्थेचे जे धिंडवडे निघत होते, ते थांबतील, अशी अपेक्षा करण्यासही हरकत नाही. स्वत:ची आणि आपल्या चेल्या-चपाट्यांची दुकानदारी सुरू ठेवण्यासाठी राजकीय पाठबळाच्या हिंदोळ्यावर बिनदिक्कतपणे झुलणाऱ्या भाईंच्या काळ्या कृत्यांना आता चाप बसणार आहे. नाशिक जिल्हा धाकदपटशा दाखवून काळे विश्व चालवणाऱ्या भाईंचा नव्हे तर ‘कायद्याचाच बालेकिल्ला’ आहे, हा खाकीचा खाक्या काहीशा अस्वस्थ झालेल्या अवघ्या नाशिककरांच्या पसंतीचे शिक्कामोर्तब मिळवणारा ठरतोय. तथापि, सरकार आणि पोलीस आपापल्या भूमिकांवर ठाम राहिले तरच यामध्ये सातत्य राहील.

गेल्या काही महिन्यांपासून धार्मिक-पौराणिक पार्श्वभूमीचे नाशिक गुन्हेविश्वाच्या काळ्याकुट्ट कारनाम्यांनी अक्षरश: काळवंडले आहे. दिवसाढवळ्या चेनस्नॅचिंगपासून मुडदे पडण्यापर्यंतच्या गुन्ह्यांनी कळस गाठला आहे. सहा महिन्यांत पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहचलेली खूनसंख्या हा दुर्लौकिक नाशिकच्या कपाळी बसलाय. खंडण्या, दहशत, मारहाण, जमिनी बळकावणे आदी संघटित गुन्हेगारीचे प्रकारही नियमित घटनाक्रमांचा भाग बनला आहे. बरं ही कृत्ये करताना दोन प्रश्न नाशिककरांच्या मनात नेहमीच यावेत. पहिला तर कायदा सुव्यवस्थेला वाकुल्या दाखवण्याचे धारिष्ट्य या मंडळींत कुठून येते आणि दुसरा म्हणजे धारदार शस्त्रे, महागड्या गाड्या, विलासी जीवनशैली यांसाठी होणाऱ्या वित्त व्ययाची तजवीज त्यांना कुठून होते. या प्रश्नांची उत्तरेही आता मिळू लागली आहेत. राजकीय गुन्हेगारच ही काळी कृत्ये करण्यास धजावतात, ह्या सत्याची उकल यानिमित्त झाली आहे.

मूळात. जे भाऊ, दादा, नाना, मामा आज मजबुरीने का होईना, नाशिकला कायद्याचा बालेकिल्ला म्हणू लागलेय, त्यांचा उगम काल-परवा झालेला नाही. अनेक वर्षांचे संचित त्यांच्या धारिष्ट्य आणि आक्राळविक्राळ समृध्दीचे गमक आहे. त्यांच्या गळ्यात बिनीच्या नेत्यांकरवी पक्षाचे गमछे टाकून घेणारे स्थानिक नेते अगदीच अज्ञानी नसतात. मात्र, त्यांच्यासमवेत मोठ्या संख्येने येणारे ‘शिष्यगण’ स्थानिकांचे डोळे दिपवतात आणि तेच पक्षाला वैभवाचे दिनु आणतील, या भावनेने अशा भाई मंडळींना ‘रेड कार्पेट’ टाकली जाते. आपला पक्ष कसा विस्तारित होतोय, हे दाखवण्याचा स्थानिकांचा आटापिटा संतापजनक आणि तितकाच विस्मयकारक ठरावा. बडे नेते अनभिज्ञ असले तरी कोणत्याही पक्षाच्या स्थानिकांना एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी, त्याचा पक्षात येण्याचा उद्देश यांबाबत माहिती नसते, असे मूळीच नाही. मात्र, त्याबाबत चुप्पी साधून पक्षप्रवेशाचे सोपस्कार पार पाडले जातात. नाशिकमध्येही सध्या तेच चाललेय. विशेषत:,सत्तेमधील भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ शब्द आणि कल्पनेपलीकडील स्वरूपाचा आहे. संस्कृतीरक्षक म्हणवणाऱ्या या पक्षाबाबत तर वेगळाच अनुभव येतो. अनेकदा स्थानिक नेते-आमदारांकडून प्रवेशाला अपशकून होईल, याची जाणीव असलेले ‘भाऊं’ना गाठून आपापली इप्सितप्राप्ती करून घेतात, ज्याला पक्षविस्तार नामक व्यवस्थेचा मुलामा लावला जातो. शिस्तीचा म्हणवणारा भाजप आज गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना सामावून घेतोयं. जे वेगवेळ्या प्रकरणांत ‘आत’ जाताहेत, त्यांना पक्षातून हाकलण्याची हिकमत देखील आता स्थानिक नेतृत्वात राहिली नाही. तेव्हा मुखिया देवाभाऊंच्या राजाश्रय संकल्पनेला उखडून टाकण्याऐवजी तिला पाठबळ देण्याची ही कृती नव्हे काय ?

सारांशात, पोलीसांना गुन्हेविश्वाचा बीमोड करण्याचे स्वातंत्र्य देणे अपेक्षित आणि उचित आहेच, पण वादस्तांना घरचा रस्ता दाखवणे आणि नव्याने अशांची ‘भरती’ करण्याची संहिता प्रत्येक राजकीय पक्षांनी तयार करण्याची नितांत गरज आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्यांना कोणत्याही पक्ष वा लोकप्रतिनीधीने पाठबळ दिल्यास जनतेने त्यांना निवडणूकीत सपशेल नाकारावे. अवघ्या राजकारण्यांनी एक शाश्वत सत्य लक्षात ठेवावे की उदोउदो करून डोक्यावर घेणारी जनता उद्या पायाखाली घेण्यासही कमी करत नाही. जाग आली ती पहाट समजून कार्यारंभ करण्यात हाशील आहे. समजूतदारास अधिक सांगणे नको, इतकेच !

———

@ जनप्रिय देवाभाऊ,

नाशिकमधील गंभीर परिस्थितीबाबत आपण उधृत केलेली वचनबद्धता, गुन्हेविश्वावरील ‘ सर्जिकल स्ट्राईक’ हे आरंभशूरत्व ठरू नये. पोलीसांनी उगारलेला कर्तव्यकठोरतेचा दंडुका उद्या कोणाच्याही दबावाने खाली झुकणार नाही, याची दक्षता तुम्ही घ्या. एकीकडे काळी कृत्ये करायची आणि त्यावर पांघरून घालण्यासाठी सत्तेमधील भाऊ-दादांचा आसरा घ्यायचा, ही प्रथा तुम्हीच मोडीत काढा. पक्ष वाढवून सत्तासोपानापर्यंत पोहचता येते, हे वास्तव मान्य असले तरी पक्ष विस्तारात दुष्प्रवृत्तींना सामावून घेण्यात हाशील नाही. आज आपापली दुकानदारी चालवण्यासाठी तुमच्याच भाजपमध्ये आलेली मंडळी कालौघात तुमची सत्ता जाण्याची वेळ आल्यास तुम्हालाही ‘गुडबाय’ करतील. तेव्हा पक्षात कोण व्यक्ती कोणत्या उद्देशाने येतोय, याचीच आधी स्थानिकांकरवी शहानिशा करा. आज पूर्वीचा भाजप राहिलेला नाही. पक्ष कार्यालयात येणारे, स्वागतपर फलकावर झळकणारे काही चेहरे भाजपला न मानवणारे आहेत. अगदी परवाच्या रा. स्व. संघ शताब्दी सोहळ्याप्रसंगी निघालेल्या संचलनात असे कोणते चेहरे सहभागी झाले आणि अशा कोणत्या हातांनी पुष्पवर्षाव केला की ज्यामुळे मूळ भाजपेयींना वेदना झाल्यात. तुम्ही राजाश्रयाचा मुद्दा बोललात, म्हणून उत्कट भावना मांडावीशी वाटली. राजकारणात नकोसे पक्ष आणि नकोसे चेहरे खड्यासारखे बाजूला करण्यास वेळ लागत नाही. बाकी अधिक बोलणे नको. आपण सूज्ञ आहात.

  • अस्वस्थ नाशिककर

Comments are closed.