NGN News
Latest Marathi News

सटाणा नगर परिषद उपनगराध्यक्षपदाची कमान सुमित वाघ सांभाळणार

  • स्वीकृत नगरसेवकपदी दीपक सोनवणे, अनिल पाकळे

** श्रीकांत रौंदळ

सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे युवा नगरसेवक सुमित विजय राज वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर स्वीकृत नगरसेवक पदी भाजपचे समर्थक दीपक नंदलाल सोनवणे व अनिल केदा पाकळे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. दरम्यान तिसऱ्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये एकमत होऊ न शकल्याने ही निवड आता पुढील सभेमध्ये होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

येथील नगर परिषदेच्या सभागृहात आज नगराध्यक्ष हर्षदा राहुल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपरोक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. सुरुवातीला हिरालाल कापडणीस यांनी नगराध्यक्षांसह सर्व उपस्थित नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत करीत सभेच्या कामकाजाची रूपरेषा विशद केली. उपनगराध्यक्ष पदासाठी निर्धारित केलेल्या वेळेत सुमित वाघ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्ष हर्षदा सोनवणे यांनी जाहीर केले. तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे भाजपचे गटनेते चेतन शिवाजी रौंदळ यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात दीपक नंदलाल सोनवणे व अनिल केदा पाकळे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचेही नगराध्यक्षांनी घोषित केले. तिसऱ्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी एक मत होऊ न शकल्याने ही निवड आता पुढील होणाऱ्या सभेत केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा नगराध्यक्षांच्या हस्ते शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष वाघ म्हणाले की पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी माझ्यावर विश्वास दाखवून एक मताने माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. शहराच्या विकासासाठी आपण सर्वांनी नगराध्यक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले. नगरसेवक राहुल सोनवणे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

नगरपरिषदेच्या विशेष सभेत भाजपचे गटनेते चेतन रौंदळ, शिवसेनेचे( शिंदे गट) राहुल सोनवणे, श्री देव मामलेदार गटनेते मनीषा पवार, नितीन सोनवणे, लताबाई बच्छाव, मनीषा पाकळे, हर्षवर्धन सोनवणे, मंगेश खैरनार, चेतन मोरे, हु मेरा यासीर शेख, जयश्री गरुड , संगीता सोनवणे, तनुजा नांद्रे, महेश सोनवणे, अलका सोनवणे, विलास दंडगव्हाळ, सोनाली बैताडे ,प्रतिभा खैरनार, भूषण सोनवणे, सीमा सोनवणे, कल्पना सोनवणे यांचे सह मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील उपस्थित होते. मात्र भाजपच्या सुनंदा देवरे या एकमेव नगरसेविका अनुपस्थित होत्या. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंद उत्सव साजरा केला.

तिसऱ्या पिढीचे पदाधिकारी

सटाणा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुमित विजयराज वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचे आजोबा किसनराव बाबुराव वाघ यांनी नगराध्यक्ष पद भूषविले आहे. तर त्यांचे वडील विजयराज किसनराव वाघ यांना दोन वेळा सटाणा नगर परिषदेचे नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे.

Comments are closed.