मुंबई/एनजीएन नेटवर्क
कोविड घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांची निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. त्यांच्यासह आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. आज पहाटे ईडीने ही कारवाई केली. संजय राऊतांच्या मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोपा किरीट सोमय्या यांनी केला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवले, असा आरोप त्यांनी केला होता.
कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने आज सकाळी सुजित पाटकर आणि डॉ किशोर बिसुरे यांना अटक केली आहे. किशोर बिसुरे हे बीएमसीचे डॉक्टर आहेत, तसंच दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे डीन होते. दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचा करार सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटशी करण्यात आला होता अशी माहिती आहे. कोविड सेंटर घोटाळ्यात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण पहिल्यापासून उचलून धरलं होतं. यासंबंधी त्यांनी ईडीकडे तक्रार दाखल केली होती. ईडीनेही याप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. मुंबईतील 15 पेक्षा अधिक ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. सुजीत पाटकर यांच्यासह मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्यांवर हे छापे टाकण्यात आले होते.