मुंबई : शिवसेना ठाकरे गटातून निष्कासित केल्यानंतर नाशिकमधील बाहुबली शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. माझा भाजपात आदराने प्रवेश झाला. त्यामुळे भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. गिरीशभाऊ संकटमोचक आहेत, संकट आले की ते मार्ग काढतात आणि त्यांनी माझा मार्ग सुकर केला. मी निष्पाप आहे, असे ठाम प्रतिपादन बडगुजर यांनी यावेळी सर्वांसमक्ष केले.
बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक आणि नयना घोलप तसेच नाशिक महापालिकेतील अनेक नगरसेवक यांचा आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, आ. राहुल ढिकले आदी यावेळी उपस्थित होते. बडगुजर म्हणाले, कोरोना काळात मी काम केलं, कोणी बाहेर येत नव्हतं. मात्र, अचानक नीतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो, महापालिका निवडणुकीत दूध का दूध, पानी का पानी होईल. यापुढे गिरीश महाजन, बावनकुळे साहेब, रविंद्र चव्हाण आदी जे मार्गदर्शन करतील, त्याचे आपण पालन करू, निष्ठेने काम करु आणि परराकाष्ठा करु असेही ते म्हणाले.
विकासासाठी भाजपात पक्षप्रवेश : बावनकुळे
बडगुजर आणि घोलप यांच्या पक्षप्रवेशाने पक्ष मजबूत होईल आणि अधिक ताकदीने आम्हाला पुढे जाता येईल, असे बावनकुळे यावेळी म्हणाले. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या संकल्पाला पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. विकासासाठी भाजपात पक्षप्रवेश होत असतो, कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यासाठी त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
गिरीशभाऊ यांचा एक कॉल आणि…
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊतील कसिनो बारमधील फोटो बडगुजर यांनीची खा. संजय राऊतांना पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे, या पक्षप्रवेशाला बावनकुळे राहतील का नाही असा प्रश्न होता. अखेर, मंत्री गिरीश महाजन यांनी एक कॉल केला अन् बावनकुळे मुंबईत डेरेदाखल झाले.