नाशिक/एनजीएन नेटवर्क
रोटरी क्लब पुणे, यांनी आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धा २०१९,२०२०,२०२१ आणि २०२२ चे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये नाशिक येथून प्रकाशित होणाऱ्या सुभाषित विनोदी दिवाळी अंकाला २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. रोटरी क्लब पुणेचे प्रोजेक्ट चेअरमन प्रसाद सोवनी, अध्यक्ष लोकमान्यनगर श्री मनोज अग्रवाल तसेच पर्वती रोटरीचे अध्यक्ष स्वानंद समुद्र यांनी पत्रकाद्वारे तसे कळविले आहे. सुभाषित दिवाळी अंकाला २०२२ साठी मिळालेला हा या वर्षातला चौथा पुरस्कार आहे. मराठीबोली पुणे यांचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य, सातारा आणि यांचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार सृजन दिप दिवाळी अंक पुरस्कार मुर्तिजापूर आणि नुकताच जाहीर झालेला रोटरी क्लब पुणेचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार.
सुभाषित २०२२ चा अंक हा तपपूर्ती विशेषांक होता. गेल्या बारा वर्षांमध्ये एकोणीस पुरस्कार मिळविणारा नाशिकमधील सुभाषित विनोदी दिवाळी अंक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठासाठी ओळखला जातो. यापूर्वी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, मसाप सोलापूर, रोटरी क्लब, पुणे,अक्षरगंध कल्याण, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ, आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ, मायमराठी गौरव मंच अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.
सुभाषित दिवाळी अंकाचे लेखक, जाहीरातदार, व्यंगचित्रकार आणि मुख्य म्हणजे वाचक यांचे हे यश आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच सुभाषितची वाटचाल मोठ्या दिमाखात सुरु आहे असे प्रकाशक, संपादक सुभाष सबनीस यांनी याबाबत बोलतांना सांगीतले. नाशिक कवीचे अध्यक्ष बाळासाहेब मगर, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष विलास पोतदार, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, ज्योती स्टोअर्सचे वसंतराव खैरनार, मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, युवा साहित्य चळवळीचे किरण सोनार, साहित्यिक नरेश महाजन, विवेक उगलमुगले, रविंद्र मालुंजकर यांनी सुभाषितच्या या यशाबाबत संपादक सुभाष सबनीस यांचे अभिनंदन केले आहे.