** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : देशात प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेल्या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या अर्थसंकल्पात महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिंचे विशेष वर्ष म्हणून २०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. आगामी कुंभमेळा आणि नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प राज्यातील कष्टकरी शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला या सर्व वर्गाचे हित जपणारा तसेच नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार प्रमुख स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प असून शेती, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, उद्योग व सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
——-
जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला निश्चितच गती मिळेल. नाशिक येथे राज्य जल माहिती केंद्र स्थापन करणे, नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भरीव निधी, रामकाल पथ विकास प्रकल्प तसेच नाशिक विमानतळ विस्तारासाठी करण्यात आलेली तरतूद या निर्णयांमुळे जलव्यवस्थापन, धार्मिक पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच नाशिकला ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याच्या निर्णयामुळे औद्योगिक गुंतवणूक वाढून रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली पीक कर्जमाफी तसेच महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे जिल्ह्यातील शेतकरी व महिलांना दिलासा मिळणार आहे. तसेच या अर्थसंकल्पामुळे नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक, कृषी, पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळेल.
- आमदार पंकज भुजबळ
——–
विकासाभिमुख आणि उद्योगस्नेही अर्थसंकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा असल्याचे दिसून येते. पायाभूत सुविधा, उद्योगविकास, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती यावर दिलेला भर अत्यंत सकारात्मक आहे. या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती अधिक वेगाने होईल आणि राज्य गुंतवणुकीसाठी आणखी आकर्षक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्याची अर्थव्यवस्था 2025–26 मध्ये सुमारे 7.6 ते 7.9 टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून उद्योग व सेवा क्षेत्र या वाढीचे प्रमुख चालक ठरत आहेत. राज्याचे सकल राज्य उत्पन्न (GSDP) सुमारे ₹51 लाख कोटींच्या पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर 4.3% वरून 5.7% पर्यंत वाढण्याची अपेक्षा असून यामुळे उत्पादन, गुंतवणूक व रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक उद्योगांच्या अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर उद्योग आयुक्त नेमण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.
- आशिष नहार, अध्यक्ष, निमा
——-
‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ या संकल्पाचे प्रतिबिंब
प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन’ या चार स्तंभांवर आधारित विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून विविध क्षेत्रांमध्ये व्यापक विकासाची दिशा यातून ठरविण्यात आली आहे. नाशिक ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित होणार आणि ओझर नाशिक सिन्नर या परिसरात एव्हिएशन हब हे नाशिक साठी खूप महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या दिसतात. पायाभूत सुविधा, डिजिटल ईन्फ्रा , सोलार , आदींसाठीचे नियोजन महत्त्वाचे आहे. शेती व शेतकरी विकासाच्या केंद्रस्थानी ठेवल्यामुळे सरकारचा शेतकऱ्यां प्रति संकल्प स्पष्ट होतो. रोजगार निर्मिती व गुंतवणूक वाढीसाठी अनेक प्रमुख शहरांमध्ये लघु उद्योग पार्क होतील. या सर्वच घोषणांमुळे “महाराष्ट्र आता थांबणार नाही” हे स्पष्ट दिसते.
- प्रदीप पेशकार, प्रदेश प्रवक्ता, भाजप
——–
दूरदृष्टिचे अंदाजपत्रक
महाराष्ट्राचे अंदाजपत्रक सादर करतांना मुख्यमंत्री व अर्थ मंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यकालिन विकासाच्या अनुषंगाने विचार केल्याचे जाणवते. उद्योग ४ पिढी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या काळातही राज्याची प्रगती कशी होईल हा विचार यामागे असल्याचे जाणवते. महाराष्ट्र हे “नाविन्यता उद्योग राजधानी “असल्याने “ए आय आयुक्तालय ” निर्माण करणे, सुक्ष्म व लघु उद्योग विकासाकरीता प्रत्येक जिल्ह्यात खास केंद्रे आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन यासारख्या तरतुदी अत्यंत महत्वाच्या आहेत. महाराष्ट्र चेंबरने “गाव तेथे उद्योजक ” हे मिशन स्वीकारले असून त्याला एक पाठबळ यातून मिळत आहे. या अंदाजपत्रकाचे स्वागत !
- रविंद्र माणगावे, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर
——–
पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणारा अर्थसंकल्प
महाराष्ट्राचा नुकताच जाहीर झालेला अर्थसंकल्प हा मुख्यमंत्री यांच्या प्रगतिशील, शाश्वत व सर्वसमावेशक सुशासनाच्या चार स्तंभांवर आधारित असल्याचे दिसून येते. सर्वसाधारणपणे पाहता, या अर्थसंकल्पामध्ये मुंबई परिसरासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेषतः भविष्यातील *मुंबई 3.0 आणि मुंबई 4.0* या क्षेत्रांच्या विकासासाठी हा निधी वापरला जाणार असल्याचे दिसते. उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या निर्णयांमध्ये नाशिकमधील *त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग* तसेच *सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाला* भरीव आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यासाठी निश्चित आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून द्यावयाचा वाटा तातडीने वितरित केला जाईल, असेही जाहीर करण्यात आले आहे. यामुळे मनमाड – मालेगाव – धुळे – इंदोर या रेल्वे प्रकल्पाला निश्चितच चालना मिळेल.
- संजय सोनवणे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेम्बर
——-
शिक्षण व आरोग्य यांवरील तरतुदी स्वागतार्ह
महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील शिक्षण व आरोग्य तरतुदींवर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने आम्ही स्वागत करतो. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय एज्युसिटी व ‘मुख्यमंत्री विज्ञान वारी’ सारख्या योजना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर घेऊन जातील असा विश्वास वाटतो. अमरावतीतील नियोजित शैक्षणिक संकुल व १००% मूलभूत साक्षरता यांसारख्या योजनांमुळे ग्रामीण भागातील मुलांना विशेष फायदा होईल. मात्र, आरोग्य विभागात जिल्हा रुग्णालये व वृद्धांसाठी धोरण ही चांगली पावले असली तरी प्रत्यक्ष निधीची निश्चित आकडेवारी तरतूद न सांगितल्याने व अंमलबजावणीची खात्री नसल्याने ही घोषणा कागदावरच राहू नये याची काळजी घ्यावी.
- नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र संस्था, नाशिक
Comments are closed.