- उपचारादरम्यान ठाणेस्थित इस्पितळात घेतला अखेरचा श्वास
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नवीन नाशिक : विशेष प्रतिनिधी
नवीन नाशिक परिसरातील जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटणारे ज्येष्ठ भाजप नेते स्वर्गीय बाळासाहेब विनायक पाटील यांचे उपचारादरम्यान ठाणे येथे दुःखद निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी असल्याने रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांनी इस्पितळात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवसेनेचे पदाधिकारी व अंबिका मित्र मंडळाचे सचिव अमोल पाटील यांचे ते वडील होत. उद्या बुधवारी ( दि. ४ ) सकाळी ११ वाजता पंचवटी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बाळासाहेब पाटील यांनी १९८२ पासून भारतीय जनता पार्टी मध्ये विविध पदांवर कार्य करत मंडल सरचिटणीस ते महाराष्ट्र भाजपा राज्य परिषद सदस्य अशी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. २००२ साली सिडको भागातून भाजपचे पहिले पुरुष नगरसेवक म्हणून ते निवडून आले. पुढे नाशिक महानगरपालिका मध्ये सभागृह नेते तसेच स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
स्थायी समिती सदस्य असताना त्यांनी समाजहिताचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करून घेतला. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा अंत्यविधी मोफत व्हावा, यासाठीची योजना त्यांनी पुढे रेटली. मानवतेचा विचार करणारा हा निर्णय आजही सुरू असून सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे.
१९८० च्या दशकात सिडको परिसरातील हांडे मोर्चे, कंदील मोर्चे अशा आंदोलनांतून त्यांनी स्थानिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. पवन नगर येथील भाजी विक्रेत्यांसाठी तब्बल बारा वर्षे संघर्ष करून “जिजामाता भाजी मार्केट” उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे कष्टकरी विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध झाली.
शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय राहिले. पवन नगर येथे अंबिका मित्र मंडळ येथे चुंचाळे येथे कै उत्तमराव पाटील संस्थेची स्थापना करून त्यांनी १९९१ साली अंबिका मित्र मंडळ संचलित डॉ. शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालयाची सुरुवात केली. त्यानंतर १९९८ मध्ये डॉ. डी. एस. आहेर प्राथमिक विद्यालय, १९९९ मध्ये माध्यमिक विद्यालय सिडको वसाहत, २००५ मध्ये मुकेशभाई पटेल प्राथमिक विद्यालय दत्तनगर तसेच २०१६-१७ मध्ये विद्या विकास माध्यमिक व विद्या विकास प्राथमिक विद्यालय (दत्तनगर, चुंचाळे, अंबड) अशी सहा शैक्षणिक संस्था उभारून शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवला.
स्वतः केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले असतानाही “माझ्या कष्टकरी कामगार वस्तीतल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे” हा त्यांचा दृढ संकल्प होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थी उच्चशिक्षित होऊन देश-विदेशात विविध मोठ्या पदांवर कार्यरत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती मानली जाते. स्व डॉ डी एस आहेर यांना आपले गुरु मानणारे व लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती
जनतेसाठी सदैव उपलब्ध राहणारे, शिक्षण आणि समाजकारणाचा ध्यास घेतलेले बाळासाहेब पाटील यांच्या निधनाने सिडको परिसरासह नाशिक शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.