मुंबई/एनजीएन नेटवर्क
आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादीचे देखील काही आमदार फुटल्यानंतर सत्तेमध्ये सामील झाले आहे. पण यानंतर आता काँग्रेसच्या फुटीच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
आता काँग्रेसदेखील या फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत सहभागी झाल्याने काँग्रेस आता विरोधी पक्षनेता पदावर दावा सांगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस देखील दोन गटात विभागले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. आ. बच्चू कडू यांनी काँग्रेसला उद्देशून महाविकास आघीडीचे 10 ते 15 आमदार फुटतील असा दावा देखील त्यांनी केला होता. त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी तसाच दावा केला आहे.