नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. १३ जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले होते. आता या प्रकरणी विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दिल्ली विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला.
सीबीआयने न्यायालयाने सांगितलं होतं की, जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडला छत्तीसगडमधील पूर्व फतेहपूर कोळसा खाणी मिळाल्या होत्या. हा एका षडयंत्राचा भाग होता. यात पात्रतेच्या निकषांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तसेच अर्जांमध्ये चुकीचे दावे करण्यात आले. सीबीआयच्या माहितीनुसार, आतापर्यंत आरोप सिद्ध झालेले हे १३ वे प्रकरण आहे. विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक मनोज कुमार जयस्वाल इत्यादींचा समावेश आहे. या प्रकरणात एच. सी. गुप्ता आणि इतर दोन अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया या तिघांना प्रत्येकी तीन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे.