NGN News
Latest Marathi News

राजस्व अभियान : निफाडमध्ये ७ रोजी विशेष कृषी शेतकरी संवाद

** पुष्कर भन्साळी

निफाड : एनजीएन न्यूज नेटवर्क

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध कार्यालयांतील शेतकरी व सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविणे तसेच प्रलंबित कामांना गती देणे हा मूळ उद्देश असला, तरी बदलते हवामान आणि शेतीतील झपाट्याने होत असलेले तांत्रिक बदल लक्षात घेऊन निफाड प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे.

निफाडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून आणि निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून महसूल व कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी कृषी शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता चांदोरी येथील मिरा लॉन्स येथे पार पडणार आहे.
हवामानातील अनिश्चितता, वाढते उत्पादन खर्च आणि रोग-कीड प्रादुर्भाव यामुळे शेतकरी चिंतेत असताना या संवादातून गहू लागवडीतील सुधारित तंत्रज्ञान आणि शाश्वत उत्पादनाच्या उपाययोजना थेट तज्ज्ञांकडून जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमात कृषी संशोधन केंद्र, निफाड येथील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सहायक प्राध्यापक डॉ. निलेश मगर हे गहू लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, उच्च उत्पादनक्षम सुधारित वाणांची निवड व व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच डॉ. भरत मालुंजकर हे गव्हाचे शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना, मृदासंवर्धन, संतुलित खत व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. राजस्व अभियानाच्या चौकटीत राहून शेती क्षेत्रालाही बळकटी देण्याचा हा अभिनव उपक्रम ठरत असून, प्रशासन आणि कृषी तज्ज्ञ यांचा थेट संवाद शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तहसिल प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विशेष कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.