नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून भाषण करतील. विशेष आमंत्रण देण्यात आलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 1800 जणांचा समावेश आहे. भारतातील वेगवेगळ्या भागांमधून या खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे ज्यांनी देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचा हातभार लावला आहे. केंद्राच्या ‘जन भागिदारी’ मोहिमेअंतर्गत या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.
‘व्हायब्रंट व्हिलेज’ मोहिमेमधील गावांचे सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मासेमारी करणाऱ्यांबरोबरच सेंट्रल विस्टा या नव्या संसदेची इमारत उभारणाऱ्या कामगिरांनाही 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच खादी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या शाळांचे शिक्षक, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे कर्मचारी यांच्याबरोबर ‘अम्रीत सरोवर’ आणि ‘हर घर जल योजना’ प्रकल्पांमध्ये सहभागी झालेल्यांचाही या विशेष नियमंत्रितांमध्ये समावेश आहे. विशेष आमंत्रितांमध्ये देशातील 50 परिचारिकांचाही समावेश आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या 50 जणांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही आमंत्रीत करण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 2 शेतकऱ्यांचा समावेश आहे.