NGN News
Latest Marathi News

कुंभमेळ्याची कामे त्वरित सुरू करण्याचे आदेश द्या : खा. राजाभाऊ वाजे

  • नाशिक-पुणे, वाढवण रेल्वे प्रकल्पांना गती देण्याची मागणी
  • रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा आर्जव

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिकच्या सर्वांगीण रेल्वे विकासासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी गुरुवारी (दि.७ऑगस्ट) संसदेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेत प्रवासी सुविधा, प्रादेशिक जोडणी, धार्मिक पर्यटन, औद्योगिक वाढ आणि आगामी २०२७ च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रेल्वे पायाभूत सुविधा उभारणीची गरज यावर भर देण्यात आला.

खासदार वाजे यांनी नाशिक हा सांस्कृतिक, धार्मिक, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात देशातील महत्त्वाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगत, वाढत्या प्रवासी आणि मालवाहतूक गरजा लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली. यासाठी त्यांनी अनेक ठोस प्रस्ताव रेल्वेमंत्रींकडे सादर केले.

यामध्ये संभाजीनगर-नाशिक-रत्नागिरी-गोवा तसेच शिर्डी-अहमदाबाद (मनमाड-नाशिकमार्गे) या दोन नवीन रेल्वे सेवांच्या सुरुवातीचा आग्रह होता, ज्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात या प्रदेशांमध्ये थेट व जलद जोडणी निर्माण होईल. मनमाड-नाशिक-पुणे या महत्त्वाच्या औद्योगिक व व्यावसायिक मार्गावर थेट जोडणीसाठी काही विद्यमान गाड्या वळवण्याची सूचना करण्यात आली. .

स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी इगतपुरी व शेनवड खुर्द येथे नव्या रोड ओव्हर ब्रिजचे बांधकाम तातडीने करण्याची गरज व्यक्त झाली. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने नाशिक-पंढरपूर ‘एकादशी एक्सप्रेस’ तसेच इतर प्रमुख तीर्थक्षेत्रांना थेट रेल्वे सेवा सुरू करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वंदे भारत एक्सप्रेसचे विद्यमान वेळापत्रक कायम ठेवून नाशिक-मुंबई सकाळच्या प्रवाशांसाठी पर्यायी सेवा उपलब्ध करणे, पंचवटी व राज्यराणी एक्सप्रेसची वेळेवर धाव सुनिश्चित करणे आणि अमरावती-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेससारख्या नवीन सेवांची आवश्यकता यावरही त्यांनी भर दिला.

मनमाड-जळगाव तिसरी रेल्वे लाईन प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्यानुसार व बाजारभावाप्रमाणे योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक बंगाली समाजाच्या मागणीनुसार मुंबई-कोलकाता दूरंतो एक्सप्रेसला नाशिक रोड येथे थांबा देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला. याशिवाय कसारा घाटातील तांत्रिक अडथळे दूर करून नाशिकपर्यंत स्थानिक गाड्या सुरू करण्याचे, विशेषतः २०२७ च्या कुंभमेळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

या भेटीत कुंभमेळा २०२७ लक्षात घेऊन नाशिकसाठी १२ महत्त्वाचे दीर्घकालीन प्रकल्पांची रूपरेषा सादर करण्यात आली. यात स्थानक उन्नती, नवीन रेल्वे मार्ग, नवे स्थानक, वांदे मेट्रोसारखी आधुनिक सेवा, तसेच औद्योगिक क्षेत्रांना चालना देणाऱ्या सुविधा यांचा समावेश आहे. खासदार वाजे यांनी या सर्व प्रकल्पांना तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आणि कुंभमेळ्यापूर्वी बहुतेक कामे पूर्ण व्हावीत यावर ठामपणे भर दिला. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी मांडलेल्या सर्व प्रस्तावांचे गांभीर्याने परीक्षण करून शक्य तितक्या लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

——————
रेल्वे बाबत नाशिककर सातत्याने अन्याय झाल्याची जनतेची भावना आहे. याबाबत मागील वर्षभरात अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. ही मंत्री महोदयांसोबत मागील वर्षभरातील किमान दहावी भेट आहे. या सर्व कार्यकाळात नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प, मनमाड ते मुंबई चौथी व पाचवी रेल्वे लाईन, कसारा बोगदा, नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण असे किमान १२ प्रकल्प टप्प्यात आहेत. त्याला अजून गतीने चालना मिळावी अशी मागणी मंत्री वैष्णव यांच्याकडे केली आहे. तसेच, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कामे कालबद्ध पद्धतीने मंजूर करून कामाला सुरुवात व्हावी अशी देखील मागणी केली.

: राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक लोकसभा

Comments are closed.