माजी मंत्री श्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्त्वात उपक्रम; २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
‘सोलापूर सोशल फाउंडेशन’ आणि ‘चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या ‘सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२५’ चे उद्घाटन शनिवारी जागतिक पर्यटन दिनी २७ सप्टेंबर रोजी होत आहे. महाराष्ट्राचे माजी वस्त्रोद्योग मंत्री आणि विद्यमान आमदार श्री सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव पार पडत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, निसर्ग व ग्रामीण पर्यटनाचा प्रचार व प्रसार या उद्दिष्टाने हा महोत्सव साजरा होत असून तो ‘5-पी मार्केटिंग ब्रँ डिंग’ संकल्पनेवर आधारित आहे. प्लेसेस, पर्सनॅलिटीज, प्रॉडक्ट्स, प्लेसमेंट, पोल्युशन फ्री एन्व्हायर्नमेंट या पाच महत्वपूर्ण ‘पी’चा आविष्कार या महोत्सवात घडणार आहे.
‘प्लेसेस’ म्हणजेच जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक, औद्योगिक व ग्रामीण पर्यटन स्थळे; ‘पर्सनॅलिटीजम्हणजे सोलापुरातील कलाकार, संशोधक, आधुनिक शेतकरी, उद्योजकः ‘प्रॉडक्ट्स’ म्हणजे स्थानिक खाद्यसंस्कृती, कृषी उत्पादन व औद्योगिक निर्मिती; चौथा ‘पी’ म्हणजे प्लेसमेंटच्या माध्यमातून तरुणांसाठी जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती आणि ‘पोल्युशन फ्री एन्व्हायर्नमेंट’ च्या माध्यमातून वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन! अशा या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक अशा संकल्पनेतून हा विकास साकारणारण्याचे स्वप्न आहे.
“या पर्यटन महोत्सवामुळे सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेला नवे व्यासपीठ मिळणार असून त्यातून ग्रामीण व शहरी भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,” असे उद्गार श्री सुभाष देशमुख यांनी काढले. “शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पर्यटनाविषयी जागरूकता निर्माण होईल. जिल्ह्यातील नागरिकांना पर्यटन क्षेत्राशी जोडले जाण्याची संधी उपलब्ध होईल. स्थानिक उद्योग व बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल. जिल्ह्यात रोजगार निर्मितीला गती मिळेल आणि त्यातून या महोत्सवामुळे सोलापूर पर्यटनाचा ब्रँड राज्यभरात आणि देशभरात उंचावणार आहे,” असेही श्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. या महोत्सवात राज्याचे रोल मॉडेल होण्याची क्षमता आहे कारण त्याद्वारे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य होवू शकतो, असेही श्री देशमुख म्हणाले.
२७ सप्टेंबर रोजी उद्घाटन झाल्यावर २८ सप्टेंबर रोजी महिलांसाठी झिम्मा, फुगडी, उखाणे, झाड झुंज आदी पारंपारिक रविवारी २९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसाठी बाल चित्रकला महोत्सव ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान ही तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडणार आहे. १ ऑक्टोबर रोजी आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये भजन, भारुड, कीर्तन व महामंगल आरती आयोजित करण्यात आली आहे तर महोत्सवाच्या सांगता दिनी २ ऑक्टोबर रोजी वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व परिसंवाद असा कार्यक्रम पार पडणार आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे लोकांपर्यंत पोहोचावीत यासाठी विशेष प्रयत्न या महोत्सवात केले जाणार आहेत. पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोलीतील सूर्य मंदिर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल संगमचे नदीकाठच्या रम्य मंदिरासह गावोगावच्या अन्य प्राचीन मंदिरांचा इतिहास पर्यटकांसमोर येणार आहे. डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक – ज्ञान व समाजसेवेचे प्रतीक असून आजही डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे विचार प्रेरणादायी आहेत. हे या महोत्सवाचे मोठे फलित असेल.
पर्यटन सप्ताह निमित्ताने आपापल्या गावागावातील ऐतिहासिक ठेवे, संस्कृती, परंपरा आणि निसर्गाचा अद्भुत वारसा यांचे दर्शन इथे येणाऱ्यांना होणार आहे. या महोत्सवात चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र, विविध रंगतदार कार्यक्रमांसह सांस्कृतिक, पारंपरिक व आध्यात्मिक उपक्रमांचा संगम, मोफत बैलगाडी फेरी, ई-कार सफर, जादूचे खेळ अशी विविधरंगी पर्वणी इथे येणाऱ्या प्रत्येकाला अनुभवता येणार आहे. सोलापूरचे निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि संस्कृती यांचा संगम अनुभवताना जिल्ह्याचा गौरवशाली भूतकाळ आणि उज्ज्वल भविष्य एकत्र साजरे करण्याची ही एक अनोखी संधी आहे. येथील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याबरोबरच धार्मिक स्थळांचा अनुभव घेण्याची जिल्हा माहितीपट आणि प्रदर्शनांचा आनंद अनुभवण्याची, स्थानिक कलाकृती, खाद्यपदार्थ व बाजारपेठांना भेट देण्याची अनोखी संधी इथे मिळणार आहे. आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर करण्यास विसरू नका, असे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे.
त्याशिवाय सोलापूरच्या विविध गावांचे भूषण असलेल्या व्यक्तिमत्वांचा कि ज्यांत उद्योजक असतील, उच्च पदस्थ अधिकारी असतील, साहित्यिक असतील अशांचा गौरव गावात करून तो आपल्या गावाचा आहे हे लोकांसमोर येणार आहे. आपले असामान्य कर्तृत्त्व विविध क्षेत्रात गाजवलेल्या या असामान्य व्यक्तीमत्त्वांना या महोत्सवात आमंत्रित करून त्यांना एक गाव दत्तक घेण्याची विनंती केली जाणार आहेत. त्यांच्या विचारांनी आणि संकल्पनांनी या गावातील पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि विकासाची गंगा या गावांमध्ये वाहू लागेल, हे संकल्पना त्यामागे आहे.
या महोत्सवामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्याबद्दल उलगडून सांगताना आमदार देशमुख म्हणाले, “प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याच्या काळात एक महिन्यामध्ये जर साठ कोटी लोक येत असतील आणि त्या प्रत्येकाने एक हजार रुपये जरी त्याठिकाणी खर्च केले असतील तर साठ हजार कोटी रुपये प्रयागराजचे उत्पन्न वाढले. बरे हे मी फक्त सरासरी म्हणतोय. मग या पार्श्वभूमीवर मला असे वाटते की माझ्या सोलापूरला एक कोटी लोक येतील असे गृहीत धरले तर येथे प्रत्येकाला काम मिळेल, आर्थिक उलाढाल प्रचंड वाढेल.”
Comments are closed.