नंदिनी नदीवर गॅबियन वॉल (संरक्षक भिंत) बांधकामाचे भूमिपूजन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
लाडशाखीय वाणी मित्र मंडळाच्या वतीने व्यवस्थापित होत असलेल्या माहेरघर मंगल कार्यालयाचे शिस्तबद्ध, पारदर्शक व समाजाभिमुख कामकाज तसेच येथे सातत्याने राबविण्यात येणारे सामाजिक व लोकहितोपयोगी उपक्रम हे इतर सामाजिक संस्थांसाठी निश्चितच आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार नाशिक पश्चिमच्या आमदार सौ.सीमाताई महेश हिरे यांनी काढले.
माहेरघर मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस वाहणाऱ्या नंदिनी नदीवर गॅबियन वॉल (संरक्षक भिंत) बांधकामाच्या भूमिपूजन समारंभात त्या बोलत होत्या.
सोमवार, ( दि १५ रोजी ) दुपारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला लाडशाखीय वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष गिरीश मालपुरे, ज्येष्ठ आर्किटेक्ट चंद्रकांत धामणे, महेश हिरे, माजी अध्यक्ष राजेश कोठावदे, सचिन बागड, माजी नगरसेविका रत्नमाला राणे, छाया देवांग यांच्यासह विविध सामाजिक मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात आमदार सीमाताई हिरे यांनी सांगितले की, “माहेरघर मंगल कार्यालय हे केवळ एक वास्तू नसून, समाजसंकल्पनेचे मूर्त स्वरूप आहे. येथे होणारे उपक्रम समाजातील एकोप्याचे, सेवाभावाचे आणि संस्कारांचे दर्शन घडवितात. सफला एकादशीच्या दिवशी होत असलेल्या या कार्यक्रमामुळे आपले नियोजित कार्य देखील सफल झाल्याशिवाय राहणार नाही ” असा विश्वासही आमदार हिरे यांनी व्यक्त केला.
गेल्या अनेक वर्षांपासून नंदिनी नदीला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. पावसाळ्यात होणारा धोका लक्षात घेता या कामाची अत्यंत आवश्यकता होती. या मागणीसाठी आमदार सीमाताई हिरे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर या गॅबियन वॉलच्या कामाला मंजुरी मिळाली, याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मंडळाच्या वतीने आमदार सीमाताई हिरे व महेश हिरे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला नितीन दहीवेलकर, विवेक वाणी, प्रविण अलई, गिरीश महाजन, प्रशांत सोनजे, भुषण राणे, भुषण सोनजे, प्रकाश अमृतकर, प्रशांत कोतकर, निलेश मकर, संध्या कोठावदे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप कोठावदे यांनी, तर जितेंद्र कोठावदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Comments are closed.