- देव मामलेदार यशवंत गौरव पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात
** श्रीकांत रौंदळ
सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
कागदावरील संवाद वाचून वस्तुस्थितीला धरून अभिनय करणाऱ्यास अभिनेता म्हणतात. मात्र प्रशासनात समाज व देशाप्रती आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्यांना महानायक म्हणावे लागेल, असे गौरवोद्गार प्रतिभावंत सिने अभिनेता अजिंक्य देव यांनी काढले.
देव मामलेदारांचा वारसा पुढे नेणारे अधिकारी आज राज्य व केंद्र शासनाच्या प्रशासनात कार्यरत असून अशा महानायकांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभल्यामुळे आपण स्वतःला भाग्यशाली समजतो, असेही ते म्हणाले. वडील रमेश देव यांनी देव मामलेदारांवर चित्रपट काढण्याची इच्छा व्यक्त केली होती. आगामी काळात इतिहासातील सर्व दाखले व वस्तुस्थितीचा अभ्यास करून संवाद लेखनातून हा चित्रपट प्रत्यक्षात उतरवण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले.
सटाणा येथे आयोजित देव मामलेदार यशवंत गौरव पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे कॅन्सर रोबोटिक सर्जन डॉ. राज नगरकर होते. याप्रसंगी महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, ओडिशा सरकारमधील सहकार सचिव राजेश पाटील आणि नाशिक परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांना देव मामलेदार गौरव पुरस्कार अजिंक्य देव व डॉ. राज नगरकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना महिला व बालविकास आयुक्त महिला गुंडे म्हणाल्या की, शासनातील जबाबदार महिला अधिकारी म्हणून कर्तव्य प्रामाणिकपणे बजावल्यामुळेच आपली पुरस्कारासाठी निवड झाली. याचा मला आनंद होत आहे. पुण्यात देशातील पहिली इलेक्ट्रिक बस धावली असून त्यामध्ये महिलांसाठी 30 बसेस सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिलांवर कुटुंबीयांकडून हिंसाचार झाल्यास मदतीसाठी जिल्हाभर शाखा कार्यरत आहेत. अशा महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाल्याने त्याचे सोने करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य उपसंचालक डॉ कपिल आहेर म्हणाले की, आरोग्य विभागात धाडसी निर्णय घेऊन काम करण्याची संधी मिळते. हे संस्कार वडिलांकडून मिळाले. जिल्हा आरोग्य अधिकारी असताना उद्दिष्ट साध्य करणे किती कठीण असते हे लक्षात आले. अधिकारी व समाज एकत्र येऊन एच आय व्ही सारख्या आजारांवर मात करण्यात यश ,िळवले. कोविड सारख्या आजाराला प्रभावीपणे तोंड देण्यात आले असेही ते म्हणाले.
अध्यक्ष डॉ.राज नगरकर म्हणाले की, देव मामलेदार यांचे कार्य 120 वर्षानंतरही आज स्मरणात घेतले जाते .यावरून त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात येते. हजारो अधिकाऱ्यांमधून चांगले अधिकारी निवडून त्यांचा सन्मान करणे या मागील हेतू व मूल्य समजून येतात. पुरस्कार स्वीकारणे व देणे या दोन्ही गोष्टी जबाबदारी वाढवणारे आहेत. या पुरस्कारासी माझे नाव जोडले गेल्याने समाज हित जपण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. कॅन्सर सारखा आजार गंभीर असला तरी धीर सोडू नये, विज्ञान व तंत्रज्ञान आपल्या सोबत आहे असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. जितेंद्र मेतकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व आभार देव मामलेदार यशवंत गौरव पुरस्कार समारंभाचे समन्वयक पत्रकार देवेंद्र वाघ यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र मेतकर व प्रियंका खैरनार यांनी केले. याप्रसंगी अतिथींच्या हस्ते लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवकांचा तसेच तालुक्यातील विशेष कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास तहसीलदार कैलास चावडे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, प्रा .डॉ. दिलीप शिंदे, प्रा. बी . जे. शेवाळे, शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद बापू पाटील, डॉ. विलास बच्छाव ,केदा काकुळते, भाऊसाहेब अहिरे, सहाय्यक गटविकास अधिकारी भैय्यासाहेब सावंत, भास्कर तांबे, लालचंद सोनवणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंत बापू अहिरे, प्रकाश देवरे, केशव मांडवडे, डॉ. किरण अहिरे, प्रकाश निकम यांचेसह शहरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.