नाशिक/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्याच्या विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा शब्द देत जिल्ह्यातील अनेक कामांना गती दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ही ग्वाही दिली. ते म्हणाले, नाशिकला झोपटपट्टीमुक्त करण्याचा आमच्या सरकारचा मानस आहे. नाशिकची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी प्रदूषण मुक्त करायची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात आहे. गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतील. याशिवाय, तसेच अनेक दिवसांपासून रखडेलला नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येणार आहे. याबाबतची बैठकही पार पडली असून या प्रकल्पामुळे अहमदनगरसह नाशिक जिल्ह्याचा विकास होणार आहे. तसेच, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू असून जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात विकासाचे काम
नाशिक जिल्हा हा मिनी महाराष्ट्र असून सगळ्या मंत्र्यावर जबाबदारी दिली असून नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विकासाचे काम होणार असून यासाठी कुठल्याही जातीपातीचे राजकरण न करता सर्व घटकांना एकत्रित घेऊन काम करू असे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा असून महाराष्ट्राच्या विकासासाठी देशाच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.