NGN News
Latest Marathi News

सहा फ्लाईटस.. १६२३ प्रवाशांची ने-आण ! नाशिक विमानतळाचा विक्रम

नाशिककरांची विमान प्रवासाला वाढती पसंती; फ्लाईटसच्या संख्येत वाढ होणार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

दिवसभरात सहा फ्लाईटसच्या माध्यमातून तब्बल १६२३ प्रवाशांची ने-आण करून नाशिक विमानतळाने आगळावेगळा विक्रम नोंदवला आहे. रविवारी ( दि. २६ ) ७९३ प्रवाशांना नाशिक येथून इतरत्र नेण्यात आले तर इतर ठिकाणांहून ८३० प्रवासी नाशिक विमानतळावर दाखल झाले. रविवारच्या या ‘फ्रिक्वेन्सी’ने स्थानिक विमानतळावर गेल्या ७ जून रोजी नोंदवलेला १३३४ प्रवासी संख्येचा विक्रम मोडीत काढला.

गेल्या काही महिन्यांपासून नाशिककर विमान प्रवासाला पसंती देत असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून अधोरेखित झाले आहे. वेळेची बचत आणि सुखकर प्रवासाचे गणित यामुळे साध्य होते. विशेषतः, मुंबई, दिल्ली, बंगळूरू आदी शहरांत जाणाऱ्या नाशिककर प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. चालू आठवड्यापासून नाशिकहून जाणाऱ्या फ्लाईटसच्या संख्येत वाढ होणार असल्याची माहितीही पुढे आली आहे.

दिल्लीसाठी दुसऱ्या फ्लाईटचा प्रारंभ..

दरम्यान, नाशिकहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता इंडिगो कंपनीने रविवारपासून दिल्लीसाठी दुसऱ्या फ्लाईटचा श्रीगणेशा केला. उद्योग-व्यवसाय क्षेत्रांतील व्यक्तींना सोयीस्कर व्हावे, यासाठी नाशिकहून दिल्लीसाठी रात्री ८.५० वाजता फ्लाईट निघणार असून दिल्लीहून नाशिकसाठीच्या प्रवासाची वेळ सायंकाळी ६.२० वाजेची असणार आहे. पहिल्याच दिवशी या सेवेला उत्तम प्रतिसाद लाभला. या सेवेमुळे विदेशात जाण्यासाठी दिल्लीहून कनेक्टेड फ्लाईटचा मेळ घालता येणार आहे.

खा, वाजे, खा. भगरे यांची दिल्लीवारी..

दरम्यान, दिल्लीसाठी सुरु झालेल्या दुसऱ्या फ्लाईटदरम्यान नाशिक आणि दिंडोरीचे खासदार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांनी प्रवास केला. ही सेवा सुरु व्हावी म्हणून दोहो खासदारांनी विशेष प्रयत्न केले. याबाबत दोघांनी समाधान व्यक्त करून यामध्ये सातत्य राखण्याची गरज प्रतिपादित केली. आपण दिल्लीला जावून केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना भेटून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे खा. भगरे यांनी सांगितले.

उद्यापासून जयपूर, इंदूर, हैदराबाद सेवा अध्याय

नाशिक विमानतळावरून उद्या ( दि. २८) पासून जयपूर, इंदूर आणि हैदराबाद या देशातील प्रमुख शहरांसाठी विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यामुळे नाशिकच्या कनेक्टीव्हिटीला आणखी बळ प्राप्त होईल. सदर सेवा आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सुरु राहतील. जयपूरहून विमान सकाळी ११.४५ वाजता निघून इंदूरला दुपारी १.३० वाजता तर तिथून विमान नाशिकला दुपारी २.४० ला नाशिकला पोहचेल. नाशिकहून हाच प्रवास दुपारी ३ वाजता सुरु होवून इंदूर ( दुपारी ४.१५ ) मार्गे जयपूरला सायंकाळी ५.३० वाजता समाप्त होईल. हैदराबादहून सकाळी ६.५० वाजता निघणारे विमान नाशिकला ८.४० वाजता पोहचेल, तर नाशिकहून सकाळी ९ वाजता निघणारे विमान हैदराबादला १०.४५ वाजता पोहचेल.

@ देशाच्या उद्योग वर्तुळात नाशिकचे महत्व वाढत असल्याचा प्रत्यय गेल्या काही महिन्यांत वाढलेल्या फ्लाईटस आणि प्रवासी संख्येवरून स्पष्ट होते आहे. वास्तविक अजूनही फ्लाईटस वाढवून नाशिकला इतर महत्वाच्या शहरांना कनेक्ट करणे गरजेचे आहे. ‘निमा’ च्या माध्यमातून सरकारकडे आमचा त्यासाठी आग्रह असेल. विमानसेवेतील सातत्य नाशिकच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरणार आहे. या सेवेमुळे अनेक बडे उद्योगसमूह नाशिकला पसंती देतील. विशेषतः आयटी उद्योगासाठी विमानसेवा आत्यंतिक गरजेची आहे. या सेवेमुळे उद्योगांसह धार्मिक पर्यटन वर्धिष्णू व्हायला नक्कीच मदत होईल.

  • मनीष रावल, उपाध्यक्ष ‘निमा’, चेअरमन, निमा एव्हिएशन कमिटी

Comments are closed.