
- तेजस्वीनी सातपुते एसआयटी प्रमुखपदी; खरातच्या घर, फार्म हाउसची झाडाझडती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील वादग्रस्त अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला बुधवारी बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे. राज्य सरकारकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणी एसआयटीची स्थापन केली आहे.
अशोक खरात याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर बुधवारी पहाटे त्यास पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतले. खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली. खरात प्रकरणी सरकारने एसआटीची स्थापन केली आहे. तेजस्वीनी सातपुते यांच्याकडे एसआटी प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एसआटी स्थापन झाल्याने अशोक खरातचे आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांनी याधी खरातच्या घराची झाडाझडती केली.
फार्म हाऊसवर छापा
खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर रात्री उशिरा क्राईम ब्राँचने छापा टाकला. यावेळी अशोक खरातच्या मिरगाव मधीलफार्म हाऊसमधून महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले आहे. अशोक खरातच्या मालमत्ता आणि अन्य काही महत्त्वाचे कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अशोक खरातच्या फॉर्म हाऊसमधून एक पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केलं. पिस्तूल आणि काही वापरलेले तर काही न वापरलेले काडतूस देखील पोलिसांना सापडल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.
व्हिडीओमध्ये नामांकित महिला, सेलिब्रिटी
तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. भविष्य जाणून घेण्यासाठी बडे बडे नेते, सेलिब्रिटी अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावायचे. तसेच अशोक खरातचा आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवतो आणि त्यानंतर गैरवर्तन करतो, असं दिसून येते. खरात याला अटक केल्यानंतर सिन्नर तालुक्यातील मिरगावचे ईशानेश्वर मंदिर चर्चेत आले आहे.
सिन्नर जवळील ईशान्येश्वर मंदिर जवळच अशोक खरातचा आलिशान फार्म हाऊस आहे. तिथे शनिवारी, रविवारी अशोक खरात येत असे, त्याच बरोबर, कोणी सेलिब्रिटी, व्हिआयपी आलेत तर त्यांच्यासोबत फार्महाऊसमध्ये मिटींग करत असल्याची स्थानिकांची माहिती आहे.

Comments are closed.