NGN News
Latest Marathi News

राहुल धोत्रे मृत्यू प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी; निमसेंच्या शोधार्थ पथके रवाना

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गेल्या २२ ऑगस्ट रोजी किरकोळ वादाचे हाणामारीत पर्यावसान होवून जमावाच्या हल्ल्यात राहुल धोत्रे नामक युवकाचा मृत्यू झाला होता. नांदूर नाक्याजवळील जनार्दननगरात हा प्रकार घडला होता. जमावाचे नेतृत्व भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे करीत होते आणि त्यांच्या चिथावणीमुळे हल्लेखोर आक्रमक झाल्याचा धोत्रे कुटुंबियांचा आरोप आहे. दरम्यान, राहुल याच्या हत्येचा तपास आता विशेष तपास पथक अर्थात एसआयटी मार्फत केला जाणार आहे.

मारहाणीनंतर राहुल याचा उपचार घेत असताना मृत्यू झाल्यानंतर परिसरात तणाव वाढला होता. उद्धव निमसे यांना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत अशी भूमिका धोत्रे समर्थकांनी घेतल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. तथापि, संबंधितांची समजूत काढल्यानंतर शनिवारी राहुल याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने राहुल याच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. उद्धव निमसेंसह मारहाण करणाऱ्या जमावावर प्राणघातक हल्ला, खून व बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उद्धव निमसे यांच्यासह उर्वरित संशयिताना अटक करण्यासाठी शहर पोलिसांची पाच पथके मागावर आहेत. एक पथक परराज्यात असून लवकरच निमसेंसह इतरांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Comments are closed.