पुणे/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर बुधवारी मध्यरात्री कारवाई झाली. या कारवाईची माहिती स्वत:रोहित पवार यांनी एक्स वर (ट्विटर) दिली. रोहित पवार यांनी या कारवाई संदर्भात दोन राजकीय नेत्यांचा उल्लेख केला आहे. नाव न घेता त्यांनी या राजकीय नेत्यांमुळे ही कारवाई झाली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मध्यरात्री झालेल्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.
रोहित पवार यांची बारामती ॲग्रो ही कंपनी आहे. या कंपनीच्या बारामती येथील प्लॅन्टवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने कारवाई केली. प्रदूषण मंडळाकडून रात्री २ वाजता आमदार रोहित पवार यांना नोटीस देण्यात आली आहे. या नोटिशीत बारामती ॲग्रो या कंपनीचा प्लॅन्ट ७२ तासांत बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पवार यांनी सोशल मीडियावर या कारवाईची माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाली आहे. द्वेष मनात ठेवून एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीवर पहाटे दोन वाजता कारवाई झाली. एखादी भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, हे माझ्या युवा मित्रांना सांगू इच्छितो. मी घेतलेल्या भूमिकेमुळे ही कारवाई होत आहे. परंतु अशा काही अडचणी आल्या तर मी संघर्ष थांबवेल, असे नाही. मराठी माणसाचे वैशिष्ट म्हणजे ते भूमिका बदल नाही. माझ्या लढा सुरुच राहणार आहे.
वाढदिवसाआधी कारवाई
रोहित पवार यांचा २९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्याचा एक दिवस आधी ही कारवाई झाली आहे. त्यावर रोहित पवार यांनी म्हटले आहे की, माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो. आता जनता सरकारला ‘रिटर्न गिफ्ट’ देणार, याची मला खात्री आहे.