- युथ फेस्टिवल मैदानात पाच दिवसीय आयोजन; कृषी दिंडीने होणार शुभारंभ
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने 23 ते 27 जानेवारी दरम्यान नाशिक मधील युथ फेस्टिवल मैदानात होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवाचे उदघाटन शुक्रवारी गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे, चंद्रकांतदादा मोरे,आयोजक आबासाहेब मोरे, ना गिरीश महाजन, ना नरहरी झिरवाळ, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, हिरामण खोसकर, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, आत्मा चे अभिमन्यू काशीद यांचेसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन होत आहे. सकाळी 11 वाजता यनिमित्ताने रामकुंड ते कार्यक्रम स्थळापर्यंत कृषी दिंडीचं आयोजन करण्यात आले असून चार वाजता मुख्य उदघाट्न सोहळा संपन्न होईल.
गेली 15 वर्ष नियमितपणेआयोजित होणाऱ्या या महोत्सवाचे सोळावं वर्ष असून पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात शेतकरी उत्कर्ष व शेतकऱ्यांचं मनोबल वृद्धिंगत होण्यासाठी भरगच्च कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
विधवा,विधुर,घटस्फोटीत तसेच आत्महत्याग्रस्त, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मुलं-मुली,दिव्यांग आणि इतर सर्व धर्मीय विवाह इच्छुकांसाठी भव्य वधु वर मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा, स्वयंरोजगार विभागा अंतर्गत युवक, युवतीना रोजगार, नोकरी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळावा, सरपंच, ग्रामसेवक मंदियाळी, सायबर सुरक्षा मार्गदर्शन,शेतकऱ्यांच्या उन्नती साठी झटणाऱ्यांना कृषी माऊली पुरस्कार, दुर्मिळ वनौषधी प्रदर्शन,विविध विषयांवर परिसंवाद अश्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी यानिमित्त दिली.
गेली 15 वर्ष या जागतिक कृषी महोत्सवात सातत्याने लाखो शेतकरी, तज्ज्ञ, सामाजिक संस्था, विद्यार्थी, कृषीशी संबंधित उत्पादक, कंपनी, संशोधक, अभ्यासक भेट देत असतात. गत वर्षी पाच लाख व्यक्तींनी या महोत्सवात हजेरी लावली होती. या वर्षी निश्चितच यापेक्षा ज्यादा संख्येने लोक भेट देतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून येथे दरवर्षी प्रमाणे प्रवेश मोफत आहे.
अधिक माहिती देताना आबासाहेब मोरे म्हणाले की गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी आतापर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर हजारो शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि त्यातून शेतकऱ्यांचा उत्कर्ष कसा साधता येईल यावर सातत्याने चिंतन केले आहे. विषमुक्त शेती कशी करता येईल याबाबत सातत्याने गेली पन्नास वर्ष मार्गदर्शन केलं आहे.कृषी महोत्सव शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक दृष्टीने सक्षम बनविण्यासाठीच आहे.
विशेष म्हणजे विवाह परिचय मेळाव्यात ज्या इच्छुकांचे विवाह जमणार आहेत त्यांचा सामुदायिक सोहळ्यात विवाह साध्या व वैदिक पद्धतीने संपन्न होणार आहे. या आधीच्या जागतिक कृषी महोत्सवात दरवर्षी अनेक विवाह संपन्न झाले आहेत. रोजगार मेळाव्यात नोकरी साठी आलेल्यापैकी 200 हून अधिक युवकांना जागेवरच नियुक्तीपत्रदेण्यात येणार आहेत.पाच दिवसरोज सकाळी व सायंकाळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सत्र, मेळावे, कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.
Comments are closed.