NGN News
Latest Marathi News

लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचे ‘शोले स्टाइल’ आंदोलन

  • कांदा उत्पादकांच्या मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधले; केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

** राकेश बोरा

लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना कांदा उत्पादकांच्या मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन करीत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात शुक्रवार (दि. २७) सकाळी कांद्याचे लिलाव सुरू झाले.यावेळी कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली घसरल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह शिवसेना(ऊबाठा) निफाड तालुकाप्रमुख शिवा सुरासे, छावा क्रांतिवीर सेनेचे गोरख संत, नवनाथ वैराळ, शिवसेना (उबाठा)चे संतोष पानगव्हाणे, अभिजीत डुकरे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन करीत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

या आंदोलनामुळे बाजार समिती परिसरात मोठी खळबळ उडाली होती 

या वेळी सरकारने भावांतर योजना लागू करावी,नाफेड मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीची चौकशी करावी तसेच नाफेडने प्रत्यक्ष बाजार समितीत उतरून कांद्याची खरेदी करावी,कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा.सरकारने बाजारपेठेत तातडीने हस्तक्षेप करून घसरणारे दर थांबवावेत.कांदा उत्पादकांसाठी ठोस आर्थिक मदतीची घोषणा करावी अशी जोरदार मागणी शिवा सुरासे यांनी बोलतांना केली

तसेच सध्या सुरु असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व आमदारांनी कांदा प्रश्न  लक्षवेधी करणे अत्यावश्यक होते जर सरकार लक्षवेधी ऐकून घेणार नसेल तर या सर्व लोकप्रतिनिधींनी विधानसभेतून काढता पाय घ्यावा अशी मागणीही शिवा सूरासे यांनी यावेळी बोलताना केली 

यावेळी मंत्री छगन भुजबळ,माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे,आ दिलीप बनकर,आ राहुल आहेर तसेच खा भास्करराव भगरे यांनी आंदोलनकर्त्यांशी भ्रमणध्वनी द्वारे  चर्चा करून कांद्याचे सर्व प्रश्न आम्ही राज्यात व केंद्रात मांडणार असल्याचे आश्वासन दिले व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.त्यामुळे त्यांच्या तसेच बाजार समिती चे उपसभापती ललित दरेकर,सचिव नरेंद्र वाढवणे,निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे व लासलगाव पोलीस ठाण्याचे स पो नि दीपक पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलनकर्त्यांनी सदर आंदोलन तात्पुरते स्थगित केले.मात्र या गंभीर परिस्थितीची शासनाने दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

Comments are closed.