जळगाव/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे अंगणात खेळून घरात गेलेल्या दोन वर्षाच्या बालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलगा घरात येऊन अचानक ग्लानी आल्याने जमिनीवर कोसळला आणि त्या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून ही दुःखद घटना समोर आली आहे. कार्तिक शशिकांत बडगुजर नावाच्या बालकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. धरणगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावातील हा बालक आहे. कार्तिक अंगणात खेळून घरात गेल्यानंतर त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली पडला. कार्तिकच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ डॉक्टरांकडे नेले. मात्र दवाखान्यात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कार्तिकचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण डॉक्टरांनी सांगितले. एवढ्या लहान मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबियांना धक्काच बसला. कार्तिकच्या मृत्यूनंतर बडगुजर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.