NGN News
Latest Marathi News

इगतपुरीत धक्कादायक निकाल; इंदुलकर निष्प्रभ.. शिन्देसेना वरचढ !

** वाल्मिक गवांदे

इगतपुरी : एनजीएन न्यूज नेटवर्क

इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीच्या शालिनी खातळे यांना एकुण झालेल्या १७२२४ मतांपैकी १०१५१ इतकी मते मिळाल्याने विजयी झाल्या. तर प्रतिस्पर्धी उमेदवार मधुमालती मेंद्रे यांना ४२८१ इतकी मते मिळाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत शालीनी खातळे यांनी भाजपाच्या मधुमालती मेंद्रे यांचा ५८७० मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) युतीचे १८ नगरसेवक विजयी, तर कमळाचे २ व मशालचा १ उमेदवार विजयी झाले.

गेली ३० वर्ष नगरपरिषदेवर सत्ता अबाधित ठेवणाऱ्या माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा व त्यांनी उभ्या केलेल्या पॅनलचा दारुण पराभव झाला. माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी ३० वर्षापासून शिवसेनेचा ( उबाठा गट ) नगरपरिषदेवर सत्ता काबीज ठेवली होती. मात्र ऐन वेळी इंदुलकर यांनी भाजपात प्रवेश करून निवडणुक लढवल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे बोलले जात आहे. माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश शिरोळे यांनी दारुण पराभव केला. तर ३० वर्षापासून संजय इंदुलकर यांना टक्कर देणारे माजी नगराध्यक्ष फिरोज पठाण दणदणीत विजयी झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) १३ उमेदवार, शिवसेनेचे ( शिंदे गट ) ५ उमेदवार, भाजपाचे २ उमेदवार, शिवसेनेचे ( उबाठा गट ) १ उमेदवार निवडून आला.

Comments are closed.