पुणे/एनजीएन नेटवर्क
पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून एटीएसला काही धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत. एटीएसला युनुस साकी आणि इम्रान खानच्या घरात सिलिंग फॅनमध्ये लपवलेल्या कागदामध्ये हाताने लिहिलेली बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया असलेला कागद सापडला आहे. याशिवाय एटीएसला अॅल्युमिनियम पाईप, बल्बचा फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्याही सापडल्या आहेत. याप्रकरणी सीमाब काझी या 27 वर्षीय तरुणाला मंडणगडहून अटक करण्यात आली आहे. कोंढव्यामध्ये सीमाब काही दिवसांपूर्वी आई आणि भावाला घेऊन शिक्षणासाठी राहिला होता.
एटीएसने कोथरूडला पकडलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी रत्नागिरीमधून एकाला अटक केली आहे, त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान आणि मोहम्मद युनुस साकी यांना 23 जुलैला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासात मिळालेल्या माहितीवरून अब्दुल कादीर दस्तगीर याला या दोघांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर आता चौथ्या संशयितालाही अटक करण्यात आली आहे.