NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

धक्कादायक ! उद्योगपतीला परिचीताकडून 58 कोटींचा गंडा; कसा, कुठे ?

0

नागपूर/एनजीएन नेटवर्क

ऑनलाइन गेमिंगचे अ‍ॅप तयार करून उद्योगपतीची तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी जवळपास 10 कोटींची रक्कम ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातूनच ही रक्कम जप्त केली आहे. अनंत उर्फ सोमटू जैन असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपीचे फिर्यादीशी मैत्रीपूर्ण संबंध होते. मागील दोन वर्षांपासून या गेमच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने फसवणूक करत आरोपीने तब्बल 58 कोटी रुपयांचा फिर्यादीला गंडा घातला. नागपूर पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच तपास सुरु करण्यात आला. आरोपी हा गोंदियाचा असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला असता मोठी रक्कम सापडली आहे. आरोपीच्या घरातून पोलिसांना कोट्यावधी रुपये मिळून आले. सध्या पैशाची मोजमाप सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः दहा कोटी रुपयांची मोजणी झाली आहे. तसेच चार किलो सोनेही घरात मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

आरोपीने तयार केलेल्या ऑनलाइन गेमिंगच्या अ‍ॅपमध्ये तीनपत्ती, कसिनो यासारखे विविध गेम होते. लिंकच्या माध्यमातून गेम लॉगिन आयडी देऊन हे अ‍ॅप शेअर केले जात होते. तसेच गेम खेळण्यासाठी पैसे दिल्यावर कॉइन स्वरूपात रक्कम ही त्या ॲपमध्ये जमा होत होती. अ‍ॅप सुरु झाल्यानंतर त्यावरुन विविध गेमद्वारे जुगार खेळला जायचा. मात्र हा जुगार खेळताना जर कोणी जिंकत असेल तर अ‍ॅपमध्ये अचानक एरर येत होता. या अ‍ॅपवरुन खेळणाऱ्या फिर्यादीने आपण गेम जिंकू असे म्हणत म्हणत त्यामध्ये कोट्यवधी रुपये लावले. मात्र नेहमीच अशाच प्रकारचा एरर येत राहिला. शेवटी फिर्यादीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्याच्या पायाखालची जमिनच सरकली.

फिर्यादीने तक्रार करण्यासाठी थेट पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केले. तपासामध्ये अ‍ॅपचे सर्व्हर हे देशाबाहेर सुद्धा असल्याची शंका असल्यानं पोलिसांनी कसून शोध सुरु केला आहे. दरम्यान यातील मुख्य आरोपी देशाबाहेर पळून गेल्याची शंका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.