बुलढाणा/एनजीएन नेटवर्क
समृद्धी महामार्गावर गेल्या १ जुलै रोजी सिंदखेडराजा जवळ झालेल्या अपघातात २५ जणांचे प्राण गेले होते. या अपघाताशी निगडीत विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचालकासंदर्भात धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव अहवालात समोर आले आहे.
अपघाताचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचे निष्पन्न झालं आहे. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, चालक शेख दानिशच्या अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते. परिणामी, त्या मध्यरात्री घडलेला तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का अशी शंका निर्माण झाली आहे.
दहा वर्षे तुरुंगवास?
प्राथमिक निष्कर्षानुसार, अपघातावेळी ड्रायव्हर झोपला होता आणि त्यामुळे बस मध्यभागाच्या भिंतीवर आदळली होती आणि बसला आग लागून अपघात घडला. आयपीसी कलम 304 अन्वये बसचालकावर दोषी हत्येसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक दानिशच्या रक्त अहवालामुळे त्याला दोषी ठरवले जाऊ शकते, परिणामी त्याला दहा वर्षे तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.