नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
महिलांच्या मासिक पाळीबद्दल देशात अनेक चर्चा झडतात. मात्र, या चर्चा शहरी आणि एका विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित राहतात का, अशी शंका निर्माण करणाऱ्या घटना अवतीभवती घडत असतात. काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीला मासिक पाळीमुळे रक्तस्त्राव झाल्याने तिच्या भावाने तिची हत्या केली होती. आपल्या बहिणीने लैंगिक संबंध ठेवले असावे असा संशय आरोपीला आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे देशातील 71 टक्के मुलींना मासिक पाळीबाबत काहीच कल्पना नाही, असे एका पाहणीतून समोर आले होते.
भारतात मासिक पाळीमुळे होणारे भेदभाव आणि इतर प्रथांमुळे होणाऱ्या अनेक घटना समोर येतात. मासिक पाळीबाबत फक्त मुलीच नव्हे तर पुरुषांमध्येही जागरुकता यावी यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी 15 जून रोजी ‘युनेस्को’ने दिल्लीत मासिक पाळी आणि आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता यावर स्पॉट लाइट रेड (#Spot light Red) या नावाने मोहीम सुरू केली आहे. मासिक पाळीमुळे मुलींनी शिक्षण अर्धवट सोडू नये हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेतील भागीदार, P&G चे उपाध्यक्ष गिरीश कल्याणरामन म्हणाले, “भारतातील तरुण मुलींना कोणतेही संकोच न करता त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. याशिवाय या मोहिमेअंतर्गत आम्ही मुलींना पीरियड्सबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून पीरियड्स आल्यानंतर त्यांना कोणत्या तरी भीतीने शाळा सोडावी लागू नये.