नागपूर/एनजीएन नेटवर्क
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाने गेल्या दीड महिन्यात ४५ हजार बनावट ‘जीएसटी’ खाते शोधून काढले. या खात्यातील बनावट व्यवहारातून १३ हजार कोटींची करचोरी झाली, अशी माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे (सीबीआयसी) सदस्य संजय कुमार अग्रवाल यांनी दिली.नागपुरात बुधवारी आयोजित मेळाव्यात विविध क्षेत्रातील उद्योजकांच्या ‘जीएसटी’शी संबंधित समस्यांवर चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अग्रवाल म्हणाले, देशभरात ‘जीएसटी’ प्रणाली आणखी सुलभ करण्यासाठी विविध क्षेत्रातील उद्योजकांचे मेळावे घेऊन समस्या जाणून घेतल्या जात आहेत. या समस्या नक्कीच सोडवल्या जातील.
१६ मे २०२३ पासून देशभरात ‘जीएसटी’ चोरीच्या विरोधात केंद्र आणि राज्याच्या ‘जीएसटी’ विभागाने विशेष मोहीम राबवली. त्यात दीड महिन्यात ४५ हजार बनावट ‘जीएसटी’ खाते शोधले गेले. या खात्यातून १३ हजार कोटींची करचोरीही उघडकीस आली. या सर्व खात्यांच्या व्यवहारातील परताव्यापोटीची १ हजार ४३० कोटींची रक्कम रोखून ठेवण्यात आली आहे. ही कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. या बनावट व्यवहारासाठी बनावट पावत्यांसह बनावट कागदपत्र, भाड्याचे खोटे करार, खोटे आधार कार्ड वापरले गेले. काहींना अटकही करण्यात आली, असेही अग्रवाल यांनी सांगितले.