नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा मोदी मंत्रिमंडळाचा अखेरचा फेरविस्तार असणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्ली दौरा केला आहे. या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच शिंदे गटातील काही खासदारांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त ठरल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या रविवारी अथवा बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार आकार घेणार असल्याची वंदता आहे.
आगामी लोकसभा आणि पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार व भाजप संघटनेत येत्या काही दिवसांत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खराब कामगिरी असलेल्या १२ पेक्षा जास्त मंत्र्यांना हटवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. या बारा मंत्र्यांच्या जागी तेवढ्याच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. अशातच या फेरबदलामध्ये शिंदे गटातील तिघांना संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटातील तिघांना (एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्री) स्थान देण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शिंदे गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद येणार, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र कुणाला मंत्री करायचे हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवल्याची माहिती मिळते आहे. एनडीए मजबूत आहे हा संदेश देण्यासाठी केंद्रात शिंदे गटाला तीन मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पदे असा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. मात्र आता शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त ठरल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या रविवारी अथवा बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार आकार घेणार असल्याची वंदता आहे. खात्रीशीर सूत्रांनी ही माहिती दिली आहे.