निफाड/प्रिया बैरागी
निफाड शेतकरी संघटनेचे नेते तथा निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रल्हादराव नामदेवराव कराड यांचे आज (रविवारी) निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रांतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच तालुक्यावर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेल्या ८ दिवसापासून नाशिक येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात सहा मुले , दोन मुली, सुना नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे नाशिक येथील मानस हॉस्पिटलचे संचालक डॉ मनोहर कराड आणि निफाड येथील न्या रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त विश्वासराव कराड यांचे ते वडील होत तर शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सुधीर कराड यांचे ते आजोबा होत.
कराड यांनी प्रामाणिकपणे, संयमशील वृत्तीने , तत्त्वनिष्ठ विचारधारा अंगी बाणवून राजकीय ,सहकार ,शिक्षण क्षेत्रात कार्य केले स्वतःच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला लहानपणापासूनच राष्ट्रसेवा दलाची विचार प्रणाली असलेले कराड यांनी 27 वर्ष त्यांनी समाजवादी पक्षाचे काम केले शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते म्हणून नेतृत्व केले शेतकरी संघटनेच्या अनेक आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कराड यांनी अवघा महाराष्ट्र ढवळून काढला होता शेतकरी संघटनेचे नेते स्व. शरद जोशी , स्व. माधवराव खंडेराव मोरे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी संघटनेचे नेतृत्व केले कराड यांच्या पहाडी भाषणामुळे त्यांना महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेची बुलंद तोफ म्हटले जायचे
निफाड तालुक्याच्या अनेक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता निफाड सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता निफाड येथील न्या रानडे विद्या प्रसारक मंडळाचे ते संस्थापक विश्वस्त होते याच संस्थेचे ते अनेक वर्ष कार्यकारी विश्वस्त होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक मान्यवरांनी जळगाव येथील त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले सोमवार दिनांक 17 रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत त्यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी जळगाव येथील ग्राम संस्कार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता त्यांच्या पार्थिवावर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
————————-
@ शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आणि निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! शेतकरी चळवळ व सहकाराच्या माध्यमातून निफाड तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक लोकप्रिय नेता काळाच्या पडद्याआड गेला. कराड कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.
- छगन भुजबळ,
मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,महाराष्ट्र राज्य
@ पितृतुल्य प्रल्हाद (दादा) कराड हे मुल्याधिष्टित राजकारणातील निस्वार्थी उत्तुंग व्यक्तिमत्व होते. संघर्षाच्या वाटेवरील प्रवासी असलेल्या दादांनी शेतकरी चळवळीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विविध आंदोलने केली. माझ्या स्वतःच्या राजकीय वाटचालीत सिंहांचा वाटा असणाऱ्या सहकारमहर्षी आदरणीय दादांना माझ्या कदम परिवाराच्यावतीने तसेच निफाड तालुक्यातील जनतेच्यावतीने भावपूर्ण आदरांजली.!
- अनिल कदम, माजी आमदार, निफाड