‘शासन आपल्या दारी’ अभियान लोकचळवळ बनलीय : एकनाथ शिंदे
नाशिक/एनजीएन नेटवर्क
शासन आपल्या दारी अभियान हा शासकीय कार्यक्रम राहिला नसून लोकचळवळ बनली आहे. या अभियानामुळे लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला आहे. राज्यातील 75 लाख लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर या अभियानाच्या माध्यमातून हास्य फुलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शासन आपल्या दारी कार्यक्रमांच्या व्यासपीठावर कष्टकरी बांधकाम कामगार, बचतगटाच्या महिला, तृतीयपंथीय, विद्यार्थी, सरपंच अशा समाजातील सर्व घटकांच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करून व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. हे या कार्यक्रमाचे आगळं-वेगळं वैशिष्टये होते.
डोंगरे वसतिगृह मैदान येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा नाशिक जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे, ॲड माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, डॉ.राहूल आहेर, सिमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बोरसे, नितीन पवार, मौलाना मुफ्ती मोहम्मद, राहूल ढिकले, हिरामण खोसकर, सुहास कांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत यांच्यासह जिल्ह्यातील लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ अभियानात नाशिक जिल्ह्यात १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली योजनांचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने एका वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सर्व निर्णय सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, विद्यार्थी तरूणांच्या हिताचे आहेत. 35 सिंचन प्रकल्पांना शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मुंबई मेट्रो, समृध्दी महामार्ग व जलयुक्त शिवार यासारख्या प्रकल्पांना चालना देण्याचे काम शासन करत आहे.
महिला सक्षमीकरणासाठी बचतगटांना अधिक भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध लोकाभिमुख योजना राबवित आहे. एकाच वेळेस 75 हजार पदांची भरती केली जाणार आहे. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमाच्या माध्यमातून तरूणांना सक्षम करण्याचे काम शासन करत आहे. शासनाच्या विकासाच्या योजनांपासून कोणीही वंचित राहणार नाही, सर्वांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू : देवेंद्र फडणवीस
उत्तर महाराष्ट्र पर्यायाने नाशिक जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी गोदावरी व तापी खोऱ्यातून वाहून जाणारे पश्चिमेचे पाणी अडविण्यासाठी नार-पार प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन खान्देशसह नाशिक, अहमदनगर ही जिल्हे कायमची दुष्काळमुक्त करण्यात येतील. पुढील तीन वर्षात नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसाला बारा तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
शासनाने मागील वर्षभरात राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्र गुंतवणूकीत भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक बॅंक राज्यातील 10 हजार गावांमध्ये ॲग्री सोसायटी स्थापन करण्यास शासनाला मदत करणार आहे. निओ मेट्रोच्या कामाला ही लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल. शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. नाशिक येथे आयोजित शासन आपल्या दारी योजनेत शासकीय योजनांच्या लाभाचा कुंभमेळा भरला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार : अजित पवार
महाराष्ट्राचा विकास हे शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. मिनी महाराष्ट्र म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. तसेच शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना आश्वस्त केले.
शासन आपल्या दारी कौतूकास्पद कार्यक्रम : डॉ.भारती पवार
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभा शासन आपल्या दारी या उपक्रमातून गावोगावी पोहचविण्यात येत आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ त्यांना या उपक्रमातून मिळत असल्याने नागरिकांचा शासनावरील विश्वास दृढ होत आहे. सेवा, सुशासन व गरीब कल्याण संकल्पनेतून शासन कौतूकास्पद काम करत आहे. असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाची माहिती डॉ.अमोल शिंदे यांनी दिली. २५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचे ई- भूमिपूजन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्ह्यात अनुकंपा भरतीतून 490 अनुकंप धारकांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शासनाच्या विविध योजनांच्या १७ लाभार्थी व ६ सरपंचांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. यामध्ये स्मिता डोंगरे, मुळी मौळे, बिजला नवले, अनिल बच्छाव, दुर्गा जाचक, साहेबराव चौधरी, अर्जून भोडवे, रूंजा टोंगरे, अनिल जाधव, दिलीप गांगुर्डे, गणेश पवार, राहूल निकम, राधाबाई दोंदे, भारती कडाळे, दिगंबर कड, शितल पाळदे, बापू काकुळते यांचा समावेश होता. स्मार्ट ग्राम कार्यकारी सरपंच गोरख जाधव, सचिन दरेकर, सुनिता पगारे, अश्विनी पवार, भाऊराव गवळी व शितल पवार या ६ सरपंचाच्या समावेश होता. या सर्व लाभार्थ्यांचा व सरपंचांना लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शासन आपल्या दारी उपक्रमाची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील शासकीय कामकाजावर आधारित दृकश्राव्य माहितीपट दाखविण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किट, ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात संदीप थाटसिंगार यांच्यासह ९ जणांच्या पथकाने देशभक्तीपर गीत सादर केली. स्वप्निल डुंबरे व त्यांचे सहकलाकारांनी पोवाडा सादर केला. पंढरपूर येथील चंदाताई तिवाडी यांनी भारूडाच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत माहिती दिली. यामुळे कार्यक्रमात रंगत आली.
*एका छताखाली 40 शासकीय विभागाच्या माहितीचे स्टॉल*
‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्हा कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महसूल विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कृषी, आदिवासी विकास, महिला व बाल विकास , जिल्हा परिषद शिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, स्वच्छ भारत मिशन कक्ष जिल्हा परिषद, भूमी अभिलेख विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, जिल्हा मत्स्यव्यवसाय विभाग, महानगरपालिका, नगरविकास या विविध शासकीय विभागांचे 40 स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारी, निवेदने स्वीकारण्यात आली. जिल्हा सामान्य प्रशासन रूग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासही या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोजगार मेळाव्यात 50 आस्थपनांचा 4 हजार 500 रिक्त पदांसाठी मुलाखती घेतल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रभू श्रीरामाची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरूवात राज्यगीताने करण्यात आली तर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगिताने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आभार मानले.