NGN News
Latest Marathi News

सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ; मशालधारी भाविक दाखल

  • अखंड ज्योत नेण्याची परंपरा यंदाही दिमाखात

** रघुवीर जोशी

सप्तशृंगगड : एनजीएन न्यूज नेटवर्क

साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान तथा पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत अखंड ज्योत नेण्याची परंपरा यंदाही दिमाखात पार पडली. महाराष्ट्रसह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांतून मशाली हातात घेऊन भाविक पायी प्रवास करीत गडावर दाखल होत असून रात्रंदिवस परिसर “सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे की जय”च्या गजराने दुमदुमत आहे.

ज्योत परंपरा….

घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला गडावर भाविकांची प्रचंड मांदियाळी जमली. दिवसभर देवीची अखंड ज्योत घेणारे गट मशाल पेटवत मंदिरातून बाहेर पडत होते. रात्रीच्या वेळीही भाविक मशालीच्या प्रकाशात कीर्तन, भजन आणि देवीचा जागर करत पुढे निघाले. या अखंड ज्योत परंपरेचे भाविकांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठी गर्दी केली.

आभूषण पूजन…

सकाळ सत्रात विश्वस्त संस्थेच्या मुख्यकार्यालयात श्री भगवतीच्या आभूषणांचे पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.अभय लाहोटी यांनी केले. त्यानंतर विश्वस्त संस्थेच्या मुख्यकार्यालायातून श्री भगवतीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आभूषणांच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. त्यानंतर ही आभूषणे मंदिरात नेण्यात आली. दरम्यान पंचामृताने देवीच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. तसेच श्री भगवती प्रथम माळीस भरजरीचे महावस्त्र नेसविण्यात आले. सांजशृंगारानंतर श्री भगवतीस आभूषणे परिधान करण्यात आले. त्यात डायमंड जडीत सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याचे पुतळ्यांचे गाठले, सोन्याचा मयुर हार, सोन्याचा गुलाब हार, सोन्याचे कर्णफुले, सोन्याची नथ, सोन्याचे पाऊल, चांदीचा कमरपउटा, चांदीचा मुगुट आदि अलंकारांचा समावेश आहे..

आजची पंचामृत महापूजा प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केली. तसेच प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष श्री.अभय लाहोटी व पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी श्री भगवतीचे दर्शन घेतले.

भाविकांना विविध सेवा-सुविधा….

भाविकांसाठी ट्रस्टच्या अन्नपूर्णा प्रसादालयात नेहमीप्रमाणे मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून स्वच्छतेच्या दृष्टीने मोबाइल टॉयलेट्स आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. संपूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधा दिवसरात्र उपलब्ध आहेत. संपूर्ण गड परिसर देवीभक्तीच्या जयघोषात न्हाऊन निघाला असून अखंड ज्योत परंपरेची शान, प्रशासनाची तयारी आणि भाविकांचा ओसंडून वाहणारा उत्साह यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव अधिकच भव्य आणि भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे.

शिवाल तीर्थ …

शिव शक्तीचे संगम असलेल्या श्री क्षेत्रावर शिवालय तीर्थांचे प्राचीन महत्व आहे श्री भगवतीच्या दर्शनाला जाण्या पूर्वी शिवालय तीर्थात स्थान केल्या नंतर श्री भगवतीच्या दर्शनास भाविक जातात पोरानिक मान्यतेनुसार शिवालय तीर्थ स्नान केल्यावर विविध रोग नाहीसे होऊन श्री भगवतीचा आशीर्वाद भाविकांना मिळतो अशी भाविकांची श्रद्धा तथा मान्यता आहे ज्यामुळे चैत्र व नवरात्र उत्सव काळात लाखो भाविक शिवालय तीर्थ येथे स्नान करून मगच श्री भगवतीचे दर्शन घेतात…

वैयक्तिक वाहनांना गडावर बंदी ….

श्री क्षेत्र सप्तशृंग गड हे गावठाण वन्य व नैसर्गिक सौंदर्यात वसलेले असून श्रीक्षेत्रावर यात्रा कालावधीत होणारे गर्दीचे नियोजन बघता वैयक्तिक वाहने मोठ्या संख्येने आल्यास वाहन कोंडी व भाविकांचे गैरसोय होऊ शकते यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून नांदुरी येथून एसटी महामंडळाच्या बसने भाविकांना सप्तशृंग गड ते नांदुरी येथे प्रवास करावा लागणार आहे सालाबाद प्रमाणे सदरचा प्रवास हा जादा बसेस कार्यरत केला असून यात्रा कालावधीत वैयक्तिक वाहनांना श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर मज्जा करण्यात आलेला आहे.

Comments are closed.