NGN News
Latest Marathi News

सामाजिक सौंदर्याची वीण तुटतेय : शरद पवार यांच्याकडून चिंता व्यक्त

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मारकाचे आंबे दिंडोरी येथे उद्घाटन

दिंडोरी : विशेष प्रतिनिधी

सामाजिक ऐक्य जपणाऱ्या महाराष्ट्रात आजची परिस्थिती बघता सामाजिक सौंदर्याची वीण तुटली जात असल्याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत असताना सर्वांनी एकोपा राखण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे असे आवाहनही त्यांनी केले.

दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे होते. पवार म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय निकटचे म्हणून दादासाहेब गायकवाड यांची ओळख होती. दादासाहेबांचे राज्य आणि देशासाठी मोठे योगदान होते. त्यांनी समाजातील दीन-दलित, भूमिहीन, उपेक्षितांच्या उद्धारासाठी मोठे काम उभे केले. यशवंतराव चव्हाणांसोबतही त्यांनी काम केले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना शशिकांत शिंदे यांनी सदर स्मारक लोकार्पण उशिरा झाले तरी ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना अभिप्रेत असलेल्या शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा जपणाऱ्या शरद पवार यांचे हस्ते झाले असल्याचे सांगितले. प्रास्ताविक पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केले. याप्रसंगी खासदार भास्कर भगरे, निलेश लंके, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे, दादासाहेब गायकवाड यांचे पणतू सागर गायकवाड, आनंदराव गायकवाड यांची भाषणे झाली. आभार शाम हिरे यांनी मानले. यावेळी जि. प. माजी अध्यक्ष विद्याताई पाटील, माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, माजी जि प गटनेते प्रविण जाधव, गोकुळ पिंगळे आदिसह विविध मान्यवर उपस्थित होते.

दादासाहेबांनी राज्यसभा उमेदवारी नाकारली..

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मृतींना उजाळा देताना शरद पवार म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊ केली मात्र त्यांनी ती नाकारली. अशा त्यागी वृत्तीचे दादासाहेब होते. त्यांचे विचार आजच्या तरुणांनी आत्मसात करावे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जीवन चरित्राचा इतिहास कथन करताना त्यांचा एकसष्टी कार्यक्रम नाशिकला झाल्याचा संदर्भ देत त्या सोहळ्यास उपस्थित नाशिक जिल्ह्यातील विविध मान्यवरांचा पवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

Comments are closed.