येवला/एनजीएन नेटवर्क
माझा अंदाज चुकला म्हणून माफी मागतो, अशा शब्दांत छगन भुजबळांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला. काही जणांनी सांगितले, पवारांनी नाव दिले आणि आम्ही निवडून दिले. एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा निवडून दिले. नाव कधी चुकले नाही, पण एका नावाने घोटाळा केला, त्या ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा होता. त्यासाठी आम्ही इथे आलोय, कुणाचे कौतुक करण्यासाठी नाही तर इथे माफी मागण्यासाठी आलोय. माझा अंदाज कधी चुकूत नाही, इथे मात्र अंदाज चुकला, असे म्हणत पवार यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर प्रथमच शरद पवार नाशिक जिल्ह्यामध्ये आले होते. त्यांचे कधीकाळी अत्यंत विश्वासू असलेल्या छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात येवल्यात पवार यांनी सभा घेतली. यावेळी मोजक्या शब्दांत जोरदार भाषण करून येवलेकरांची मने जिंकली. याप्रसंगी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, खा. सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, श्रीराम शेटे, ज्येष्ठ नेते मारोतराव पवार, अंबादास बनकर, माणिकराव शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पवार यांनी वय झाल्याने निवृत्त होण्याचा सल्ला देणा-यांनाही त्यांनी चांगलेच फटकारले. बाकी काहीही टीका करा चालेल मात्र वैयक्तिक आणि वयाची टीका खपवून घेणार नाही. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मी वयाच्या 92 वर्षापर्यंत लढणार असल्याचे यापूर्वीही शरद पवार यांनी म्हटले. जनतेने दिलेल्या विश्वासाला कुणी तडा देत असेल कोणी विश्वात करत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही जर कोणी असे करत असेल तर त्याची किंमत आज ना उद्या त्याला द्यावी लागेल असा इशारा देखील पवारांनी दिला आहे.
.. नाहीतर मोदींनी माफी मागावी
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात काँग्रेसवर टीका केली, राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. माझे पंतप्रधान यांना सांगणे आहे की आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर, असेल नसेल तर सर्व यंत्रणा वापरा, जर आम्ही दोषी असलो तर कारवाई करा, आमची जी काही चौकशी करायची ती करा, जो काही निष्कर्ष निघेल, तो आम्ही स्वीकारायला तयार आहे, अन्यथा माफी मागा, असे आव्हान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.