बारामती/एनजीएन नेटवर्क
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमधून बंड करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर वारंवार शरद पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांच्यासह बंड केलेल्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्याविरोधात शरद पवार यांनी आक्रमक होत साथ सोडून गेलेल्यांवर टिकास्त्र सोडले होते. अशातच आता शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे आमचेच नेते आहेत असे सूचक वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे नव्या चर्चा सुरु झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. सुप्रिया सुळेंच्या यांच्या या विधानाची चर्चा असतानाच आता शरद पवार यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना महत्त्वाचे विधान केले आहे.
——————————————-
@”अजित पवार आमचे नेते आहेतच. त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी पडते? जर पक्षातलाच एक मोठा वर्ग देश पातळीवर वेगळा झाला तर फूट पडते. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली म्हणायचे कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे.”
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस